Sachin Vaze Letter : ‘माझ्या आडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टार्गेट करण्याचा भाजपचा डाव’ – अनिल परब

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बनंतर आता या प्रकरणात निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या लेटर बॉम्बची चर्चा सुरु झाली आहे. सचिन वाझे यांनी आज एनआयएच्या (NIA) कोर्टात खळबळजनक खुलासा केला आहे. सचिन वाझे यांनी एनआयएला लिहिलेल्या पत्रात अनिल देशमुख यांच्यासह शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांवर अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी या आरोपामागे थेट भाजप असल्याचा आरोप केला आहे.

अनिल परब म्हणाले सचिन वाझे यांनी पत्रामध्ये माझ्यावर पहिला आरोप केला आहे की, सैफी बुऱ्हानी ट्रस्टींकडून मी 50 लाख रुपये मागितले. त्यांनी दुसरा आरोप केला आहे की, जानेवारी 2021 ला पालिकेच्या कंत्राटदारांकडून प्रत्येकी 2 कोटी रुपये जमा करण्याच्या सूचना मी दिल्या. या दोन्ही गोष्टी धादांत खोट्या आहेत. मी त्या नाकारतोय. मी एक सच्चा शिवसैनिक आहे. माझ्यावर खंडणीचे संस्कार नाहीत, असे परब यांनी सांगितले.

माझ्या आडून मुख्यमंत्र्यांना टार्गेट
माझ्यावर करण्यात आलेले दोन्ही आरोप खोटे असून त्यांच्याशी माझा काहीही संबंध नाही. माझ्या आडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट करण्याचा भाजपचा डाव आहे. या प्रकरणातून सरकारची आणि माझी बदनामी भाजपकडून करण्यात येत आहे. मी कायदेशीर मार्गाने लढाई लढणार आहे. माझा गृहखात्याशी काय संबंध ? शिवसेना पक्षाचे पोलिसांशी संबंधित प्रश्न मी पहात होतो. मंत्रपदावर असतानाही आणि नसतानाही मी मागील कित्येक वर्षापासून हे विषय हाताळत आहे. पोलिसांसोबत बोलून मी शिवसैनिकांची कामे करतो, ते माझे काम आहे, असेही परब यांनी म्हटले. तसेच जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा मुख्यमंत्री यासंदर्भात भाष्य करतील असेही परब यांनी सांगितले.

मी बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो…
अनिल परब म्हणाले, सचिन वाझे याने लिहिलेल्या पत्रात माझ्यावर काही आरोप करण्यात आले आहेत. ते सर्व आरोप धादांत खोटे आहेत. मी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे. ते माझे दैवत आहे. त्यांची आणि माझ्या दोन मुलींची शपथ घेऊन सांगतो माझ्यावरील आरोपांमध्ये काडीचंही तथ्य नाही. सरकारला बदनाम करण्यासाठी हे कारस्थान सुरु आहे. हप्तेखोरीचे संस्कार माझ्यावर नाहीत, असे परब म्हणाले.

माझी नार्को टेस्ट करा
सचिन वाझे यांनी माझ्यावर खोटे आरोप केले आहेत. मी सीबीआय, एनआयए असो किंवा रॉ आणा मी सर्व प्रकारच्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे. एवढेच नाही तर माझी नार्को टेस्ट करा. त्यासाठी देखील मी तयार आहे, असं खुलं आव्हान अनिल परब यांनी यावेळी दिले आहे.

हे भाजपचे कारस्थान
सचिन वाझे यांचे पत्र म्हणजे भाजपने शिजवलेलं कारस्थान असल्याचा आरोप परब यांनी केला आहे. भाजपवाले गेल्या दोन दिवसांपासून आरडा ओरडा करत होते की आम्ही तिसरा बळी घेऊ. याचा अर्थ त्यांना दोन तीन दिवसांपासून या गोष्टीची कल्पना होती. सचिन वाझे आज एनआयए कोर्टात पत्र देणार हे त्यांना आधिपासूनच माहिती होते. म्हणून ते गाजावाजा करत होते, असा आरोप अनिल परब यांनी केला आहे.