सचिन वाझेंचा NIA कोर्टात लेटर बाँब ! हस्तलिखित पत्रात अनिल देशमुखांसह शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्यावर केले गंभीर आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अंबानी यांच्या घराजवळ सापडलेली स्फोटकं आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन वाझे यांनी एनआयएच्या कोर्टात लेटर बॉम्ब फोडला आहे. सचिन वाझे यांनी कोर्टासमोर सादर केलेल्या जबाबामधून आतापर्यंतच्या सर्वात धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. हस्तलिखित पत्रातून वाझेंनी कोर्टापुढे जबाब नोंदवला आहे. त्यात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांनी आपल्याकडे दोन कोटींची मागणी केल्याचं वाझेंनी सांगितलं आहे. तसेच आणखी एका शिवसेना मंत्र्यांचं नावही या जबाबात घेतल्याने खळबळ उडाली आहे. याबाबतचे वृत्त एका वृत्तवाहीनीने दिले आहे.

सचिन वाझे यांनी जबाबात म्हटले आहे की, निलंबन टाळायचे असेल तर दोन कोटी द्या, अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुखांनी आपल्याकडे केल्याचं वाझे यांनी म्हटले आहे. आपल्याला एवढी मोठी रक्कम देता येणार नसल्याचं सांगितलं. त्याबरोबरच अनिल देशमुखांनी प्रत्येक बारमधून साडेतीन लाख वसूल करुन आणा, असंही सांगितल्याचे सचिन वाझेंनी जबाबामध्ये नमूद केले आहे.

वाझेंच्या जबाबामध्ये शिवसेनेचे मंत्रि अनिल परब यांचंही नाव आहे. अनिल परब यांनीही आपल्याला खंडणी वसूनल करायला सांगितले, असा खळबळजनक आरोप वाझेंनी कोर्टासमोर पत्रातून केला आहे. याची माहिती तत्कालीन पोलीस आयुक्तांना दिली होती. त्यांनी या सर्व बेकायदेशीर व्यवहारांपासून दूर राहण्यास सांगितले होते, असेही वाझेंनी म्हटले आहे. तसेच पत्रामध्ये वाझेंनी म्हटले आहे की, अनिल देशमुख यांनी तपास थांबवण्यासाठी 50 कोटी मागितले होते, असा गंभीर आरोप केला आहे.