मुख्यमंत्र्यांच्या ‘या’ खास माणसावर शरद पवारांची नाराजी; वाचा काय आहे कारण?

मुंबई : ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणानंतर राजकारण चांगलेच तापत आहे. यामध्ये पोलिस अधिकारी सचिन वाझे यांचे नाव आल्याने विरोधकांकडून सरकारला धारेवर धरण्याचे काम केले जात आहे. त्यानंतर आता शिवसेना गृहखात्यात हस्तक्षेप करत आहे, अशी तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली गेली आहे. त्यामुळे शरद पवार नाराज असल्याचे समजते.

सचिन वाझे यांचे नाव आल्याने आणि गृहखाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याने अडचणी वाढत आहे. त्यातच शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी गृह खात्यात सातत्याने हस्तक्षेप करत आहेत. सचिन वाझे प्रकरणात मुंबई पोलिस दलातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अनिल परब यांची भेट घेतली आहे. त्यामुळे ते एकप्रकारे हस्तक्षेप करत आहेत, अशी तक्रार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शरद पवार यांच्याकडे केली. अनिल देशमुख यांनी केलेल्या तक्रारीनंतर शरद पवार नाराज असल्याचे सांगितले जात आहे. तसेच ते या प्रकरणात स्वत: लक्ष घालतील असा अंदाज आहे.

दरम्यान, सचिन वाझे प्रकरणात गृहमंत्री देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात होती. मात्र, शरद पवार यांनी यावर भाष्य केले. त्यामध्ये त्यांनी राजीनाम्याच्या सर्व शक्यतांना पूर्णविराम देत अनिल देशमुख यांची पाठराखण केली आहे.