आता सिद्धूंना मंत्रिमंडळातूनही हकला; नेटकऱ्यांचा संताप अनावर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुलवामा हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळलेली असताना काँग्रेस नेते नवज्योत सिद्धू यांनी पाकिस्तानबाबत मवाळ भूमिका घेतली. यानंतर सिद्धूंना मात्र नेटकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. नेटकऱ्यांनी सिद्धूवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. कपिल शर्माच्या कॉमेडी नाईट्स विथ कपिल या शो मधून त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी नेटकऱ्यांनी केली होती. त्यावर सिद्धूंना या शो मधून काढल्याची माहितीही आली आहे.

कार्यक्रमातून केलेल्या हकालपट्टीनंतर आता नेटकऱ्यांनी सिद्धूंना पंजाबच्या मंत्रीमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली जात आहे. सोशल मीडियावर#SackSidhuFromPunjabCabinet हा हॅशटॅग ट्रेंड होतोय. तसंच यासोबतच #boycottsidhu हा हॅशटॅगही ट्रेंड होत आहे. त्यामुळे आता यावर काय निर्णय होतोय हे पाहणे महत्त्वाचे आहे.

दरम्यान, पुलवामामधील हल्ल्याचा सिद्धू यांनी निषेध केला होता. परंतू या हल्ल्याचा जबाबदार त्यांनी पाकिस्तानला धरलं नाही. दहशतवादाचा कोणताही धर्म आणि देश नसतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. त्यानंतर नेटकऱ्यांनी सिद्धूंवर जोरदार टीका केल्या. कपिलच्या शोमधून सिद्धूला काढून टाका, अन्यथा शोवर बहिष्कार टाकू, असा पवित्रा नेटकऱ्यांनी घेतला होता. त्यावर सोनी टीव्हीने सावध भूमिका घेत सिद्धूची हकालपट्टी केल्याचं बोललं जातंय.