ज्येष्ठ नेते, उद्योगपती आणि वनश्री नानासाहेब महाडिक यांचे निधन

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – ज्येष्ठ नेते, उद्योगपती आणि वनश्री नानासाहेब महाडिक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ते 62 वर्षाचे होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुले, मुलगी, जावई, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. वाळवा तालुका तसेच पेठ परिसरात सहकार आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी मोलाची कामगिरी केलेली. माजी मंत्री जयंत पाटील यांचे कट्टर विरोधक अशी नानासाहेब महाडिक यांची ओळख होती.

नानासाहेब महाडिक यांच्या गटाच्या पाठिंब्यावरच सध्या इस्लामपूर नगरपरिषदेत आणि सांगली जिल्हा परिषदेत भाजपला सत्‍ता मिळवता आली आहे. नानासाहेब महाडिक यांची मुलगी सौ. रोहिनी पाटील या सांगली महापालिकेच्या विद्यमान नगरसेविका आहेत तर मुलगा सम्राट आणि राहुल हे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत. ज्येष्ठ नेते, उद्योगपती आणि वनश्री म्हणून नानासाहेबांना सर्वत्र ओळखले जात होते.