सदाभाऊ खोत यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल, म्हणाले – ‘राज्यात हे करंटे-पांढऱ्या पायाचे सरकार आल्यानंतर मराठा आरक्षण रद्द झाले’

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइऩ – राज्य सरकारने पारित केलेला मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने नुकताच रद्द ठरवला आहे. यावरून राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. याच मुद्द्यावरून आता माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा लढा लढताना विरोधी पक्ष, वकिलांची मते घेतली नाही, कोर्टात योग्य बाजू मांडली नाही. तसेच गायकवाड समितीमधील महत्वाचे पुरावेही जोडले नाहीत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले मराठा आरक्षण हे करंटे, पांढऱ्या पायाचे सरकार आल्यानंतर आरक्षण रद्द झाले, अशा शब्दात खोत यांनी संताप व्यक्त केला आहे. केंद्राप्रमाणे राज्यसरकारने देखील कोर्टात याचिका का दाखल केली नाही, असा सवालही त्यांनी केला.

मराठा आरक्षण आणि अशोक चव्हाण यांनी मांडलेल्या भूमिकेविषयी खोत यांनी पत्रकार परिषद घेत यावर भाष्य केले आहे. ठाकरे सरकारमधील मराठा समाजाच्या प्रस्थापित नेत्यांनाच विस्थापित मराठ्यांना आरक्षण द्यायचे नसल्याचा आरोप करत खोत यांनी अशोक चव्हाणांवर प्रहार केला. अशोक चव्हाणांचा आदर्श घेण्यासारखा आहे, असा टोला लगावत चव्हाण वेड्याच्या रुग्णालयात जायच्या अवस्थेत असल्याचे खोत म्हणाले. प्रस्थापित मराठा नेत्याला आरक्षण उपसमितीचा अध्यक्ष करू नये, अशी खोत यांनी केली आहे. आरक्षण मिळवण्यासाठी मराठा समाज मागासलेला कसा आहे, याची नव्याने मांडणी करावी लागणार आहे. त्याचे पुरावे गोळा करावे लागतील, ते गोळा कोण करणार, प्रस्थापित मराठा नेत्यांनी आत्मपरीक्षण करावे असा सल्लाही खोत यांनी दिला. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ कुठे आहे? असा सवालही खोत यांनी केला आहे.