Coronavirus : माजी मंत्री सदाभाऊ खोत ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आला आहे. सदाभाऊ यांनी स्वतः यासंदर्भात समाज माध्यमाद्वारे माहिती दिली आहे. सदाभाऊ खोत यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. कोरोना अहवाल सकारात्मक आल्याने त्यांनी होम क्वारंटाईनचा निर्णय घेतला आहे.

“माझा कोव्हिड १९ रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे मी क्वारंटाईन झालो आहे. मी आता उत्तम आहे. आपणही आपली आणि आपल्या कुटूंबाची काळजी घ्या. गणरायाच्या आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने लवकरच आपल्या सेवेत हजर राहीन. धन्यवाद”, असं सदाभाऊ खोत यांनी फेसबुक पोस्ट द्वारे म्हटलं आहे.

दूध दरवाढ आंदोलन, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करताना सदाभाऊ खोत अनेक कार्यकर्ते आणि नागरिकांच्या संपर्कात आले होते. त्यामुळेच त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची शक्यता आहे. दरम्यान, मंगळवारी सदाभाऊ खोत हे आरोग्य विभागाला वैद्यकीय साहित्य व उपकरणे देण्याच्या उद्देशाने स्थानिक विकास निधीतून फिरते कोव्हिड संस्थात्मक अलगीकरण कक्ष स्थापन करण्यासाठी कोव्हिड केअर सेंटर, शिराळा जिल्हा सांगली येथे झालेल्या साहित्याच्या लोकार्पण सोहळ्यात सहभागी झाले होते.

राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले

कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या वाढत असतानाच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सुद्धा वाढत असल्याने दिलासा मिळत आहे. मंगळवारी राज्यात १२ हजार ३०० रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, आतापर्यंत राज्यात ५ लाख १५ हजार ७९० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७३.१४ टक्के झाले आहे. तर मंगळवारी राज्यात १० हजार ४२५ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ७ लाख ३ हजार ८२३ इतकी झाली. तर ३२९ रुग्णांचा मृत्यू कोरोना संसर्गाने झाला. सध्या राज्यात १ लाख ६५ हजार ९२१ रुग्णांवर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.