… अन् आमदार गोपीचंद पडळकरांनी कार्यकर्त्यांचे पाय धुतले, सदाभाऊ खोत देखील भारावले

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे नेहमीच चर्चेत असतात. कधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका तर कधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला अशा अनेक कारणामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. मात्र, सध्या ते एका वेगळ्याच चर्चेत आहेत. जोपर्यंत गोपीचंद पडळकर आमदार होणार नाहीत तो पर्यंत चप्पल घालणार नाही, असा पण केलेल्या आपल्या कार्यकर्त्यांचा त्यांनी ज्या पद्धतीने सत्कार केला. ते पाहून माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी देखील पडळकर यांचे कौतुक केले.

आटपाडी तालुक्यातील झरे येथील दत्तात्रय कटरे, नारायण पुजारी आणि दिवंगत जालिंदर क्षीरसागर यांना पडळकर जोपर्यंत आमदार होत नाहीत तो पर्यंत चप्पल न घालण्याचा पण केला होता. याशिवाय फेटा घालणार नाही असा पण अमरसिंह देशमुख यांनी केला होता. या कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा इरे येथे पार पडला. या कार्यक्रमाला सदाभाऊ खोत, आमदार जयकुमार गोरे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

गोपीचंद पडळकरांनी आमदार होण्यासाठी पण करणाऱ्या या कार्यकर्त्यांचे पाय धुवून त्याना चक्क चांदिच्या चप्पल पडळकरांनी घातल्या. एवढेच नाही तर त्यांना दुचाकी गाडी दिली. तर एका कार्यकर्त्याच्या वारसाला दुचाकी दिली. जालिंदर क्षीरसागर यांनी पडळकर आमदार होत नाहीत तोपर्यंत केस-दाढीचे पैसे घेतले नाहीत. कार्यकर्त्यांचे ऋण फेडण्यासाठी हा कार्यक्रम आमदार पडळकर यांच्या हस्ते पार पडला.

यावेळी गोपीचंद पडळकर यांचे कौतुक करताना सदाभाऊ खोत म्हणाले, गोपीचंद पडळकर यांच्यावरील कर्यकर्त्यांचे प्रेम हिमालयाच्या उंचीचे आहे. गरीब कुटुंबात जन्माला आलेला हा कार्यकर्ता आहे. देवेंद्र फडणवीस यांनी तळागाळातील माणसे उंचावर नेली. सोन्यासारखी माणसे मिळाल्याने सामान्य कुटुंबातील कार्यकर्ता आमदार झाला. मी आयुष्यात कधीच चप्पल पुजली नाही, मात्र गोपीचद पडळकरांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी चप्पल पुजली. कार्यकर्त्यांवर प्रेम कसे करावे, हे पडळकर यांच्याकडून शिकावे असे कौतुक सदाभाऊ खोत यांनी केले.