पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Sadabhau Khot – Sharad Pawar | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Maharashtra Assembly Election 2024) एका प्रचार सभेत बोलताना महायुतीचा घटक पक्ष असलेल्या रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांबाबत वादग्रस्त विधान केल्यामुळे ते चर्चेत आहेत. सदाभाऊ खोत यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होऊ लागल्यानंतर त्यांनी आता केलेल्या विधानावरून सारवासारव केली आहे.
सदाभाऊ खोत म्हणाले, ” मला कोणाच्याही आजारापणावर, व्यंगावर बोलायचं नव्हतं. मी केलेल्या भाष्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माझे शब्द मागे घेतो आणि दिलगिरी व्यक्त करतो. मला राजकीय आणि सामाजिक चेहऱ्यावर बोलायचं होतं.
५० वर्षांच्या कालखंडात शेतकरी आणि गावगड्यांची होरपळ झाली, त्यामुळे विस्थापितांविरोधात आम्ही ४० वर्षे लढत आहोत. लाठ्या काठ्या खात आहोत, अनेकांनी प्राणांची आहुती दिली आहे. आमचा लढा न्याय मिळवण्याकरता होता. त्यामुळे आम्हाला न्याय मिळत नाही तोवर आमचा आवाज बुलंद असेल.”
ते पुढे म्हणाले, ” गावगड्याकडे काही शब्द असतात. आभाळाकडे पाहून…पुढे मला काही बोलायचं नाही. पण मी असं बोललो असतो तर मी व्यक्तिगत पातळीवर आलो असं बोलले असते. पण गावगाडा लुटला आणि या निवडणुकीत पुन्हा लुटायला आला पाहिजे, म्हणून त्यांचा आता शेवटचा प्रयत्न सुरू आहे, असं मी म्हणालो.
जयंत पाटलांनी आमच्यावर पोस्ट टाकली आहे. ज्यावेळी मला तुमच्या गुंडांनी फोडून काढलं तेव्हा तुमच्याकडे हृदय होतं की नाही? तुम्ही पक्ष चालवता की गुंडाची टोळी चालवता? गरीब माणसांना येऊन मारलं तर गरीब माणसाने येऊन बोलायचं नाही का? मग आता तुम्हाला वाईट का वाटायला लागलं?”, असे सदाभाऊ खोत यांनी म्हंटले आहे.
सभेदरम्यान सदाभाऊ खोत शरद पवारांवर टीका करत होते तेव्हा देवेंद्र फडणवीस व्यासपीठावर बसून हसत होते, अशी टीकाही आता विरोधकांकडून केली जातेय.