शेतकऱ्यांचा मुडदा पाडणारा निर्णय ! सदाभाऊ खोतांची राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्र सरकारने सोमवारी अचानक निर्यात बंदीचा निर्णय जाहिर केल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. काही शेतकरी संघटना आंदोलनच्या तयारीत आहेत. अशात माजी राज्य कृषीमत्री आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी गुरुवार (दि.17) पासून राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. सदाभाऊ खोत पत्रकार परिषदेत बोलत होते.

कांदा निर्यातबंदी निर्णय हा शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे. तसेच शेतकऱ्यांचा मुडदा पाडणारा निर्णय असल्याचं सदाभाऊ खोत यांनी यावेळी सांगितले. निर्यातबंदी हा सुटाबुटातल्या अधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय आहे का ? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. त्यांनी पुढे सांगितले की, केंद्र सरकारचा हा निर्णय कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मान्य नाही. सध्या शेतकऱ्यांचा हा संकटाचा काळ आहे. या काळात त्यांना मदत द्यायची वेळ आली असताना त्यांच्या तोंडाशी आलेला घास सरकारने काढून घेतला आहे. मुंबई, मद्रास बांग्लादेश सीमेवर माल पोचल्यानंतर थांबवणे चुकीचे असल्याचे खोत यांनी म्हटले.

सदाभाऊ खोत यांनी सांगितले की, हा माल एक्सपोर्ट झाला नाही तर सडून जाईल. हा माल तात्काळ एक्सपोर्ट करण्याची केंद्राने परवानगी घ्यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. 5 जूनला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मुक्त बाजारपेठेची घोषणा केली होती. त्यानंतर शेतकरी आनंदी झाला. मात्र एक देश एक बाजारपेठ अशी केंद्र सरकारची घोषणा अवघ्या 3 महिन्यांत हवेत विरली, ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे, असा घणाघात खोत यांनी केला.

उद्यापासुन आमचं राज्यव्यापी आंदोलन आहे. कारण या सरकारच्या काळात शेती करणं आवघड झालं आहे. शेतीचं सरकारीकरण करा, शेतकरी काम करतील, तेवढा पगार द्या, आता सरकारनंच ठरवावं की शेतकऱ्यांना मुक्त कसं करायचं, अशा शब्दात त्यांनी सरकारवर उपरोधिक टीका केली आहे. आम्हाला भीक नको न्याय द्या अन्यथा आंदोलन आणखी आक्रमक होईल असा इशारा सदाभाऊ खोत यांनी मोदी सरकारला दिला आहे.