Sadak 2 ट्रेलर : अ‍ॅक्शन अवतारात ‘संजय दत्त’, फेक साधूंचा पर्दाफाश करणार ‘आलिया’

पोलीसनामा ऑनलाईन : आलिया भट्ट, संजय दत्त आणि आदित्य रॉय कपूर स्टारर सडक 2 चा ट्रेलर रिलीज झाला आहे. 21 वर्षानंतर दिग्दर्शनात परत आलेल्या महेश भट्टचा हा चित्रपट 1991 च्या सडक या चित्रपटापासून प्रेरित आहे. सडकचे मूळ अभिनेते संजय दत्त पुन्हा एकदा चित्रपटात दिसणार आहेत. त्यांच्याशिवाय आदित्य रॉय कपूर आणि आलिया भट्ट या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 28 ऑगस्ट रोजी डिज्नी हॉटस्टारवर प्रदर्शित होईल.

सडक 2 ची कथा काय आहे?

सडक 2 च्या ट्रेलरच्या सुरूवातीस पहिल्या पार्टच्या एका सीनला दर्शविण्यात आले आहे. तो सीन जेव्हा पूजा भट्ट आणि संजय दत्त पहिल्यांदा भेटले होते. संजय दत्त सडक 2 मध्ये आहे पण पूजाच्या पात्राचे निधन झाले आहे. या कथेनुसार पूजा गेल्यानंतर संजय दत्तचे जीवन व्यतीत करण्याचे कोणतेही विशेष उद्दिष्ट राहिलेले नाही. तो आपले उर्वरित आयुष्य पूजाच्या आठवणीत घालवत आहे. त्यानंतर कथेत आलिया भट्टची एन्ट्री होते. आलियाला बनावट साधूंचा पर्दाफाश करायचा आहे. तिला कैलासला जायचे आहे. पूजा भट्टने आलियाची कैलास यात्रा बुक केली होती. पण आता पूजा या जगात राहिलेली नसते आणि संजय दत्तने त्यांचा व्यवसाय बंद केलेला असतो.

कथेमध्ये ट्विस्ट तेव्हा येतो जेव्हा संजय आलियाला कैलासकडे नेण्यासाठी तयार होतात. आलियाच्या प्रियकराची भूमिका आदित्य रॉय कपूरने साकारली आहे. कथा पुढे सरकते आणि आलियाच्या जीवाला धोका उद्भवतो. काही साधू आलियाला जीवे मारण्यासाठी तिच्या मागे असतात. तेव्हा संजय आलियाचा जीव वाचवण्याचे काम हाती घेतात. यानंतर आपल्याला संजय दत्तचा अ‍ॅक्शन अवतार पाहायला मिळतो.

तसा ट्रेलरला लोकांकडून विशेष प्रतिसाद मिळत नाही आहे. चित्रपटाची कहाणी सामान्य असल्याचे सांगण्यात आले आहे. बरेच लोक सोशल मीडियावर स्टारकिड्सवर बहिष्कार घालण्याची मागणी करत आहेत. तर अनेकांनी संजय दत्तच्या अभिनयाचे कौतुक केले आहे.

चित्रपटाला ट्रोल का केले गेले?

सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणात महेश भट्ट यांच्या नावाचा उल्लेखही करण्यात आला. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीसोबत महेश भट्ट यांच्या काही फोटोंमुळे खळबळ उडाली होती. याशिवाय नेपोटिझ्म संदर्भात बराच गोंधळ उडाला. ट्विटरवर लोकांनी महेश भट्ट आणि आलिया भट्ट यांच्यावर बहिष्कार घालण्याची मागणी केली होती. यामुळेच सडक 2 चा ट्रेलर रिलीज होण्यापूर्वी ट्रोल झाला होता.