धक्कादायक ! आजारपणाला कंटाळून पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या, कोल्हापूर जिल्ह्यातील घटना

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – आजारास कंटाळून पती- पत्नीने घराजवळील जनावराच्या गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. आकुर्डे (ता. भुदरगड) येथे शुक्रवारी (दि. 5) दुपारी साडेबाराच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

सदाशिव बाळू भांदिगरे (वय 62) आणि सुरेखा सदाशिव भांदिगरे (वय 57) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी निवृत्ती भांदिगरे यांनी भुदरगड पोलिसांत फिर्याद दिली आहे. मयत सदाशिव भांदिगरे हे मौनी विद्यापीठाचे सेवानिवृत्त कर्मचारी होते.

भुदरगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदाशिव भांदिगरे व सुरेखा भांदिगरे पती-पत्नी आजारी होते. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून औषधोपचार सुरू होते. शुक्रवारी दुपारी घरी कोणी नसल्याचे पाहून दोघांनी घराशेजारील जनावरांच्या गोठ्यात लोखंडी पाईपला दोरी व ओढणी बांधून गळफास घेतला. यात दोघांचा मृत्यू झाला. दरम्यान सकाळपासून दोघांची चाहूल न लागल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला असता त्यांचे मृतदेह गोठ्यात लटकलेल्या अवस्थेत दिसले. यानंतर नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर गारगोटी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांच्या मागे दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.