राहुल गांधी म्हणाले -‘सद्दाम हुसैन आणि मुअम्मर गद्दाफी देखील निवडणुका जिंकत होते’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी मंगळवारी (दि.16) ब्राऊन युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर आणि विद्यार्थ्यांसोबत ऑनलाईन संवाद साधला. यावेळी त्यांनी लोकशाहीच्या मुद्यावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, इराकचा हुकूमशहा सद्दाम हुसैन आणि लिबियातील मुअम्मर गद्दाफी यांनीही निवडणूक लढवली होती आणि ते जिंकले होते. असे नव्हते की लोक त्यांना मतं देत नव्हती. मात्र त्यांच्या मतांच्या सुरक्षेसाठी कोणतीही संस्थात्मक चौकट नव्हती, असे राहुल गांधी म्हणाले.

काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी स्वीडनच्या संस्थेच्या रिपोर्टचा हवाला देत भारत लोकशाही असलेला देश राहिला नसल्याचा आरोप केला होता. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला होता. मंगळवारी राहुल गांधी यांनी ब्राऊन युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर आशुतोष वार्ष्णेय आणि विद्यार्थ्यांसोबत ऑनलाईन संवादामध्ये भारतील लोकशाहीबद्दल भाष्य केलं.

राहुल गांधी म्हणाले, निवडणुका म्हणजे लोकांनी जाऊन बटन दाबायचे आणि आपल्याला मिळाळेल्या अधिकाराच वापर करायचा. निवडणूक ही एक संकल्पना आहे, निवडणूक ही एक संस्था आहे. जी संस्था देशाची चौकट योग्य रित्या काम करत आहे किंवा नाही हे ठरवत असते. निवडणूक ही न्यायपालिका निष्पक्ष असली पाहिजे. संसदेमध्ये चर्चा झाली पाहिजे आणि कोणत्याही मतांच्या गणनेसाठी आवश्यक त्या बाबी असल्या पाहिजेत, असंही ते म्हणाले,

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी प्रोफेसर कौशिक बसू यांच्यासोबत देखील अशाच प्रकारे संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी इंदिरा गांधी यांनी देशात लावलेल्या आणीबाणी विषयी बोलताना देशात लावलेली आणीबाणी चुकीची होती असे सांगताना त्यांनी आता देशात त्यापेक्षाही वाईट परिस्थिती असल्याचे म्हटले होते. देशातील संस्थांमध्ये एक विशिष्ट विचारधारेच्या लोकांना प्रवेश दिला जात असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले होते.