Video : भाजपला ‘गोत्यात’ आणणाऱ्या ‘त्या’ वक्तव्याबाबत साध्वी प्रज्ञासिंह यांची माफी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हा देशभक्त होता, या साध्वी प्रज्ञासिंह यांच्या विधानामुळे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच खुलासा करण्याचे काँग्रेसने आव्हान दिल्याने भाजप अडचणीत आली. त्यामुळे याप्रकरणी भाजपने हात वर केल्यानंतर आता साध्वीने आपला सूर बदलत भाजपाची जी भूमिका तीच माझी भूमिका आहे, असे सांगत माफी मागितली आहे. कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्यांची माफ मागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

साध्वी प्रज्ञासिंह यांनी नथुराम गोडसे हा देशभक्त होता आणि राहिल असे वादग्रस्त विधान गुरुवारी केले होते. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदीसह भाजपने अनेक नेते महात्मा गांधींचे गुणगान करत आपले भाषण करत असतात. त्यामुळे भाजपची नेमकी भूमिका कोणती साध्वीच्या विधानाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खुलासा करावा अशी मागणी काँग्रेसने केली. हे प्रकरण वाढत गेले तर त्याचा दुष्परिणाम होण्याची शक्यता भाजप नेत्यांना वाटू लागली. त्यामुळे भाजपाने पक्षाचा या विधानाशी संबंध नसल्याचे सांगितले. तसेच साध्वीलाही शांत राहण्याचा इशारा देण्यात आला.

साध्वी प्रज्ञासिंह यांच्या त्या मताशी भाजपा सहमत नाही. आम्ही त्या विधानाचा निषेध करतो. तसेच साध्वी प्रज्ञासिंह यांच्याकडून भाजपा यासंदर्भात खुलासा मागणार असून त्यांनी आपल्या विधानाची माफी मागावी, असे भाजपाचे नेते जीव्हीएल नरसिंह राव यांनी म्हटले होते. त्यामुळे साध्वीने माफी मागण्याचा निर्णय घेतला.

साध्वी प्रज्ञासिंह यांनी हे माझे वैयक्तिक मत आहे. मी रोड शोमध्ये होते. त्यावेळी जाताना मी हे उत्तर दिले आहे. माझ्या भावना तशा नव्हत्या. यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असती. तर त्यांची मी माफी मागते. गांधीजींनी देशासाठी जे केले आहे ते विसरता येणार नाही. मी त्यांचा सन्मान करते. मी पक्षाच्या शिस्तीचे पालन करते. जी पक्षाची भूमिका आहे तीच भूमिका माझी आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

भाजपाने भोपाळमधून साध्वी प्रज्ञासिंह यांना उमेदवारी दिल्यापासून त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे त्या चर्चेत आहेत. अगोदर त्यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याचा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसह सर्वांनी निषेध केला व आम्हाला शहीद करकरे यांच्याविषयी अभिमान असल्याचे म्हटले होते.

कमल हसन यांनी नथुराम गोडसे हा स्वातंत्र्यानंतरचा पहिला हिंदु दहशतवादी होता, असे वक्तव्य केले होते. त्यावर प्रतिक्रिया विचारता गुरुवारी त्यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले.

नथुराम गोडसे हा देशभक्त होता, देशभक्त आहे आणि देशभक्त राहिल. जे लोक त्याला दहशतवादी म्हणतात. त्यांनी स्वत:मध्ये एकदा डोकावून पाहावे. या निवडणुकीतून अशा लोकांना उत्तर दिले पाहिजे, असे प्रज्ञा सिंह यांनी म्हटले होते.