भाजपा खा. साध्वी प्रज्ञासिंह यांच्या महात्मा गांधींबद्दलच्या विधानानं नवा वाद !

भोपाळ : वृत्तसंस्था – भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे. आता त्यांनी महात्मा गांधींना ‘राष्ट्रपुत्र’ असं म्हटलं आहे. महात्मा गांधी राष्ट्रपुत्र आहेत आणि ते आमच्यासाठी आदरणीय आहेत, असे साध्वी म्हणाल्या. त्यांच्या या विधानामुळे पुन्हा राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.

भोपाळमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केले. त्या म्हणाल्या, महात्मा गांधी हे राष्ट्रपुत्र असून त्यांच्यावर देश कायम प्रेम करीत राहिल, त्यांना स्मरणात ठेवेल. दरम्यान, महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीनिमित्त भाजपाने मध्य प्रदेशात ‘गांधी संकल्प यात्रे’ चे आयोजन केले होते. मात्र, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या यात्रेत सहभागी झाल्या नव्हत्या. त्यानंतर आता त्यांनी गांधींबाबत वादग्रस्त दावा केला आहे.
साध्वी प्रज्ञासिंह यांनी नुकतंच एक ट्वीट केलं आहे. यामध्ये त्यांनी कस्तुरबा गांधींची प्रशंसा केली होती. लोकसभा निवडणुकीच्या वेळी साध्वी प्रज्ञासिंह यांनी, महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला देशभक्त म्हटलं होत. यावरही मोठा वाद झाला होता. यांनंतर साध्वी यांना मी मनापासून माफ करणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले होते.

Visit  :Policenama.com