साध्वी प्रज्ञा सिंह आता ‘या’ नावाने ओळखल्या जाणार

प्रयागराज : वृत्तसंस्था – महाराष्ट्रातील २९ सप्टेंबर २००८ मध्ये करण्यात आलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी ९ वर्षे तुरुंगात घालवलेल्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आता आचार्य महामंडलेश्वर स्वामी पूर्णचेतनानंद गिरी या नावाने ओळखली जाणार आहे. आज प्रयागराज येथील कुंभमेळ्यादरम्यान तिला महामंडलेश्वर बनविण्यात आले.

मंगळवारी सकाळी ११ वाजता दिव्य प्रेम सेवा मिशनच्या एका शिबिरामध्ये साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्यावर पट्टाभिषेक करण्यात आला. यावेळी तिला भारत भक्ती आखाड्याचा प्रमुख बनविण्यात आले आहे. यावेळी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे स्वीय सहाय्यक अरुण सिंह यांनी सांगितले की, आखाड्याचे काम सनातन धर्माचे रक्षण करण्याचे आहे. अखिल भारतीय काशी विद्वत परिषदेने आजच या आखाड्याची स्थापना केली आहे.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात ९ वर्षे तुरुंगात
मालेगाव बाँम्ब स्फोटामध्ये आरोपी बनविण्यात आल्यानंतर तिच्यावर भगवा दहशतवादाचा आरोप ठेवण्यात आला होता. त्यांच्या अटकेनंतर त्यांना जुना आखाड्यातून काढून टाकण्यात आले होते. मात्र, त्यांचे निलंबन परिषदेच्या हस्तक्षेपामुळे मागे घ्यावे लागले होते. याकाळात त्यांच्याकडे कोणतेही पद नव्हते.

महाराष्ट्रातील मालेगावमध्ये २९ सप्टेंबर २००८ मध्ये एका मशीदीजवळ बाँम्ब स्फोटा घडविला गेला होता. यामध्ये ७ जणांचा मृत्यू झाला होता. तर १०० हून अधिक जण जखमी झाले होते. या प्रकरणी न्यायालयाने कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर समवेत काही जणांविरोधात आरोप निश्चित करण्यात आले होते.