वन विभागाच्या आशीर्वादाने अवैध सागवान तस्करी जोमात

नांदेड : पोलीसनामा आॅनलाइन (माधव मेकेवाड) – वन विभागाचे अधिकारी व कर्मचा-याच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षित कारभारांमुळे नायगाव तालुक्यात खुलेआम अवैधरीत्या वृक्षतोड होत आहे. तोडलेल्या वृक्षांची लाकडे ट्रॅक्टर व ट्रकने नरसी येथील चारही राज्य महामार्गावरुन विना अडथळा राजरोसपणे वाहून नेले जात आहे. वनविभागाच्या वरिष्ठ अधिका-यांनी वृक्षतोड करून त्यांची तस्करी करणा-यांची चौकशी करून होणारी वृक्षतोड थांबवावी. अन्यथा परिसर वाळवंट होण्यास वेळ लागणार नाही, अशी प्रतिक्रिया  नागरिकांतुन उमटत आहे.

शासनाने एकीकडे ‘झाडे लावा पर्यावरण वाचवा’ असा मोलाचा संदेश देश बांधवांना दिला परंतु,नांदेडसह किनवट, (बोधडी,इस्लापुर) नरसी , नायगाव, बिलोली, भोकर, परिसरातील सागवानसह अन्य वृक्षाची मोठ्या प्रमाणात कत्तल होत असल्याने पर्यावरणांचा -हास होत आहे.

तसेच वनविभागाच्या देगलुर कार्यालयाच्या अधिकारी क्षेत्रातील नायगाव तालुक्यातील कार्यरत कर्मचारी वर्ग यांच्या कार्यक्षेत्रात खुलेआम अवैधरीत्या वृक्षतोड करून तोडलेल्या अनेक वृक्षाची लाकडे ट्रॅक्टर व ट्रकने नरसी येथील चारही राज्य महामार्गावरुन विना अडथळा तस्करी राजरोसपणे सुरु असताना वनविभागाचे अधिकारी मात्र जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे अवैध वृक्षतोड करणा-या व्यापा-यांचे मनोबल वाढले आहे.

भोकर तालुक्यातील सर्व राऊंड मधून अनेक प्रकारचे सागवान तस्करी देखील सध्या सुरू आहे. कार्यवाहीची गरज असताना अधिकारी झोपेचे सोंग घेताना दिसत आहे. किनवट हा सागवानसाठी नांदेडचे माहेर घर आहे. पण त्याठिकाणी असणारे चेक पोस्ट सागवान चिरीमिरी करून चालते की काय ? अशा चर्चांना देखील उत आला आहे. वन विभागाने त्यावर उचित कार्यवाही साठी त्या ठिकाणी चेकपोस्ट वाढविण्याची गरज असल्याची चर्चा किनवट , हिमायतनगर भागात सुरू आहे.