सुशांत सिंह राजपूतच्या नातेवाईकासह दोघांवर गोळीबार ! बाईक शोरूमला जाताना घडली दुर्घटना

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बिहारच्या सहरसा जिल्ह्यातून मोठी घटना समोर आली आहे. बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) चे मामेभाऊ आणि यमाहा शोरूमचे मालक राजकुमार सिंह आणि त्यांच्या सहयोगीवर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत ते गंभीर जखमी झाले आहेत. गोळीबाराच्या या घटनेतील सहयोगी अली हसन यांची स्थिती गंभीर झाल्याचं समजत आहे.

नेमकं काय घडलं ?
यामाहा शोरूमचे मालक राजकुमार सिंह यांचं सहरसा, सुपौल आणि मधेपुरा अशा तीन जिल्ह्यात यमाहा मोटारबाईकचं शोरूम आहे. शनिवारी (दि 30 जानेवारी 2021 रोजी) मधेपुरा येथे जाताना त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली. या घटनेत राजकुमार यांच्यासह त्यांचा सहयोगी गंभीर जखमी झाले आहेत.

राजकुमार सिंह यांच्या भावाच्या मते, ते रोज मधेपुरा येथे शोरूम उघडण्यासाठी जातात. आज तिथंच जाताना बैजनाथपूर चौकाकडून एका बाईकवर 3 आरोपी आले. त्यांनी गाडीला ओव्हरटेक करत गोळीबार केला आणि दोघांना जखमी केलं. या घटनेनंतर दोघांनाही एका खासगी नर्सिंग होमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.

आरोपींनी कोणत्या कारणामुळं हा हल्ला केला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बिहारमध्ये गेल्या काही दिवसात अनेक गुन्ह्याच्या घटना समोर येताना दिसत आहेत. विरोधी पक्ष यावरून सरकारवर हल्ला चढवत आहे. त्यांचा असा आरोप आहे की, नितीश कुमार यांच्या शासनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था यांची स्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे.