साहेब ! पुन्हा 5 वर्षापूर्वीसारखी चुक करणार का ? राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना वाटतेय भिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पाच वर्षापूर्वी विधानसभा निवडणुकीचे पूर्ण निकाल लागलेले नसताना कोणालाही बहुमत मिळण्याची शक्यता नसताना शरद पवार यांनी पुन्हा निवडणुका नको असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. त्यामुळे फडणवीस सरकार विश्वास दर्शक ठरावावर तरले. त्यानंतर भाजपा राष्ट्रवादी काँग्रेसवरच उठला असून त्यांनी पक्ष संपविण्याचा प्रयत्न केला. त्याच भाजपाला सत्तेवर येण्याच्या दृष्टीने शरद पवार भूमिका घेत असून ५ वर्षापूर्वीसारखी चूक ते पुन्हा करणार की काय? अशी भिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना वाटू लागली आहे.

शिवसेनेने आपला मुख्यमंत्री व्हावा, यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र, त्याला शरद पवार यांच्याकडून विरोध होताना दिसत आहे. आम्हाला जनतेने विरोधात बसण्याचा कौल दिला आहे. आम्ही विरोधी पक्षात बसणार असल्याचे शरद पवार सातत्याने सांगत आहे. एक प्रकारे ते शिवसेनेला फटकारुन भाजपाला सत्ता स्थापनेसाठी प्रोत्साहन देत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना वाटत आहे. बुधवारीही शरद पवार यांनी आम्ही विरोधी पक्षातच बसणार या भूमिकेचा पुर्नउच्चार केला. त्यामुळे भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून सुरु झाला असतानाच पवार मात्र भाजपाला साथ देणार का असे आमदारांना वाटू लागले आहे.

पाच वर्षापूर्वी शिवसेनेला विरोध करण्याच्या नादात शरद पवार यांनी भाजपाला पाठिंबा दिला होता. त्याचा भाजपाने पूरेपूर फायदा उठवत शिवसेनेचा पाच वर्षात पदोपदी पाणउतारा केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे भाजपाचे सरकार तरले असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी, अध्यक्ष अमित शहा यांनी वारंवार शरद पवार यांना टार्गेट केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांना साम, दाम, दंड, भेद नितीचा वापर करुन आपल्या पक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला. असे असले तरी शरद पवार यांनी गेल्या ५ वर्षात संसदेत कायम भाजपाला फायदेशीर होईल, असे निर्णय घेतले, याची राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांना कल्पना आहे.

भाजपा सत्तेवर येऊ नये, म्हणून सर्व विरोधक प्रयत्न करीत असताना शरद पवार यांनी शिवसेनेला प्रोत्साहन देण्याचे काम करावे, असे आमदारांना वाटत आहे. मात्र, प्रत्येक पत्रकार परिषदेत पवार आम्हाला विरोधकात बसण्याचा कौल दिला आहे. आम्ही विरोधी पक्षातच बसणार असे सांगून शिवसेनेचे खच्चीकरण करण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे पाच वर्षापूर्वीसारखीच चुक शरद पवार करणार का अशी भिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार व नेत्यांना वाटत आहे.

जर भाजपाचे सरकार सत्तेवर आले तर पुढील पाच वर्षे ते आहे नाही तो पक्ष उद्धवस्त करण्याचा प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा द्यावा, अशी इच्छा बहुसंख्य आमदार आणि नेत्यांची आहे. पण, साहेबांना हे सांगणार कोण अशी अवस्था या आमदार आणि नेत्यांची झाली आहे.

Visit : Policenama.com