सहगल प्रकरणानंतर राज ठाकरे यांची मनसे पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून प्रख्यात लेखिका नयनतारा सहगल यांना मनसेने विरोध केल्याचा फायदा घेऊन भाजपच्या पालकमंत्र्यांनी आयोजकांवर दबाव टाकून सहगल यांचे निमंत्रण रद्द करायला भाग पाडले. मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या या परस्पर आंदोलनाच्या घोषणेचा गैरफायदा भाजपला झाला. या प्रकरणानंतर राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या आहेत. त्याबरोबर आयोजकांना जो मनस्ताप झाला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. तमाम महाराष्ट्र सैनिकांनी यापुढे संवेदनशील विषयावर भूमिका व्यक्त करताना माझ्याशी चर्चा केल्याशिवाय भूमिका मांडू नये, याची तमाम महाराष्ट्र सैनिकांनी नोंद घ्यावी, असा संदेश राज ठाकरे यांनी दिला आहे.

त्या ‘९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात’ नयनतारा सहगल यांच्या उपस्थितीवरून सुरू असलेल्या वादंगाविषयी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’ ने अधिकृत भूमिका मांडली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीटरवर पक्षाची अधिकृत भूमिका असलेले एक पत्र पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, जरी आमच्या एका सहकाऱ्याने विरोध केला असला तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अध्यक्ष या नात्याने माझा अजिबात विरोध नाही.

महाराष्ट्रातल्या मराठी साहित्य संमेलनांचे मराठीपण जपलं जावं अशी माझ्या सहकाऱ्याची भूमिका आहे. जी योग्य देखील आहे. पण नयनतारा सहगल त्यांच्यासारख्या ज्येष्ठ लेखिका जर संमेलनात येणार असतील आणि त्यांच्यासमोर जर मराठी साहित्याची समृद्ध परंपरा खुली होणार असेल आणि त्या जर ही परंपरा जगासमारे नेण्याच्या प्रक्रियेतील एक वाहक होणार असतील तर मला अथवा माझ्या पक्षाला आक्षेप असायचे कारणच नाही. ही भूमिका स्पष्ट शब्दात पक्षाचे नेते, प्रवक्ते अनिल शिदोरे यांनी परवाच मांडली आहे. पण पक्षाचा अध्यक्ष या नात्याने मी तीच भूमिका पुन्हा एकदा मांडत आहे. नयनतारा सहगल ह्यांना आमचा विरोध नाही, त्यांनी जरुर यावं, आम्ही त्यांचं मनापासून स्वागत करतो. तमाम महाराष्ट्र सैनिकांनी यापुढे संवेदनशील विषयावर भूमिका व्यक्त करताना माझ्याशी चर्चा केल्याशिवाय भूमिका मांडू नये, ह्याची तमाम महाराष्ट्र सैनिकांनी नोंद घ्यावी. मराठी साहित्य संमेलन आपलं संमेलन आहे. सर्व मराठी जनांचं संमेलन आहे. ह्या संमेलनाच्या आयोजकांना माझ्या सहकाऱ्यांच्या भूमिकेमुळे जो मनस्ताप झाला असेल, त्याबद्दल मी एक मराठी भाषा प्रेमी ह्या नात्याने मनापासून दिलगिरी आहे.

दोन वर्षापूर्वी पुरस्कार वापसीचा जो प्रकार सुरु झाला . त्याची सुरुवात नयनतारा सहगल यांनी केली होती. नयनतारा सहगल यांनी आपले उद्घाटनाचे भाषण आयोजकांना पाठविले होते. त्यात त्यांनी सरकारला चांगल्याच कानपिचक्या दिल्या होत्या. ज्या प्रमाणे सहगल यांनी पुरस्कार परत केल्यानंतर साहित्यिकांमध्ये पुरस्कार परत करण्याची मोहिम सुरु झाली होती. साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून त्यांनी त्या भाषणात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आलेली गदा आणि मॉब लिचिंग यावर परखड मते व्यक्त करताना सरकारवर जोरदार टिका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत केंद्र सरकारवर अशी टिका तीही निवडणुकीच्या वर्षात सरकारला परवडणारी नसल्याने मनसे पदाधिकाऱ्याच्या इशाऱ्यानंतर पक्षाचे प्रवक्ते अनिल शिदोरे यांनी खुलासा केला असतानाही त्याचा गैरफायदा घेत भाजपने सहगल यांचे निमंत्रणच रद्द करुन टाकले.