‘सही रे सही’ फेम अभिनेत्री गीतांजली कांबळी काळाच्या पडद्याआड, मुंबईत झाले निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – २०२० या वर्षात मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकार पडद्याआड गेले आहेत. बॉलिवूडमधील कलाकारांबरोबरच मराठी सिनेमातील देखील अनेक कलाकारांनी यावर्षी या जगाचा निरोप घेतला आहे. परंतु आता मराठी सिनेसृष्टी आणि नाट्यसृष्टीमधून आणखी एक घटना समोर आली आहे. ‘सही रे सही’ या नाटकातील अभिनेत्री गीतांजली कांबळी यांचे कर्करोगामुळे निधन झाले आहे. गेल्या काही काळापासून त्या या आजाराशी झुंज देत होत्या.आज त्यांची मृत्यूशी सुरु असलेली झुंज संपली आहे. त्यांच्यावर मुंबईमधील चर्नीरोड याठिकाणी असणाऱ्या सैफी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. आज पहाटे त्यांचे निधन झाले. गीतांजली कांबळे या कोकणातील मालवणच्या स्थायिक होत्या. पण कामांनिमित्त त्या मुंबईमध्ये आल्या होत्या.

या ठिकाणी नाटकांमध्ये काम करून त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती. त्यांना मागील काही काळापासून कॅन्सरने ग्रासले होते, गेला काही काळ त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण आज अखेर त्यांचे निधन झाले. गीतांजली कांबळे यांनी केदार जाधव दिग्दर्शित ‘सही रे सही’ या नाटकात अभिनेता भरत जाधवबरोबर केलेला अभिनय आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्याचबरोबर त्यांनी दिवंगत अभिनेते मछिंद्र कांबळी यांच्याबरोबर वस्त्रहरण या नाटकात देखील भूमिका केली होती. त्यांची ही भुमीका देखील खूप गाजली होती.

बकुळा नामदेव घोटाळे’, ‘टाटा बिर्ला’, ‘गलगले निघाले’ यांसारख्या सिनेमात देखील त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. त्याचबरोबर ५० हुन अधिक व्यावसायिक नाटकांमध्ये देखील त्यांनी भूमिका केल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, त्या 2012 पासून कर्करोगाचा सामना करत होत्या. त्यांची आर्थिक परिस्थितीही अगदी बेताची होती. त्याचबरोबर कोरोना काळात नाटके बंद असल्याने त्यांची आर्थिक स्तिथी देखील खालावली होती. त्यांच्या या आजारपणात गीतांजली यांचे पती लवराज कांबळी त्यांच्याबरोबर होते.