महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून साई एशियन हॉस्पिटल निलंबित

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – राज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या महात्मा फुले जम आरोग्य योजनेतून नगर शहरातील नामांकित साई एशियन हॉस्पिटलचे निलंबन करण्यात आले आहे. या संदर्भात भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस मनोज कोकाटे यांनी गेल्या दोन दिवसांपूर्वी महात्मा फुले जण आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांच्याकडे हॉस्पिटलची लेखी तक्रार केलेली होती. त्या तक्रारीवर कारवाई करत शिंदे यांनी आज हॉस्पिटलवर निलांबनाची कारवाई केलेली आहे.

गेल्या दोन दिवसांपूर्वी नगर तालुक्यातील चिंचोडी पाटील येथील गंगाधर कोकाटे यांचा चिंचोडी पाटील येथेच अपघात झालेला होता. उपचारासाठी त्यांना नगर शहरातील तारकपूर येथील साई एशियन हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले असता हॉस्पिटलमध्ये व्यवस्थापकानी रुग्णांच्या नातेवाईकांसोबत रुग्णाचे उपचार महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत करण्यावरून वाद केले. नातेवाईकांना उडवा-उडवीचे उत्तर देत महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून उपचार करण्यास आम्हाला परवडत नाही. आपणास उपचार करायचे तर करा, नाहीतर आपल्या रुग्णास दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करा, असा उपरोधिक सल्ला दिला होता. यावरूनच भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस मनोज कोकाटे यांनी सदर हॉस्पिटलची तक्रार केली व त्या तक्रारीची ताबडतोब दखल घेत सदर हॉस्पिटलचा परवाना या योजनेतून निलंबित करण्यात आलेला आहे.