धक्कादायक…! सई परांजपे यांच्या जीवनात देखील #MeToo, केंद्रीय मंत्र्याने विचारले होते एका रात्रीसाठी… 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन  – अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तन केल्याची तक्रार अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने केली. यानंतर संपूर्ण देशभरात #मी टू ची लाट उसळली. आता प्रसिद्ध  लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांनी देखील #मी टू अंतर्गत आपली आपबीती  सांगितली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या. अलीकडे सई यांच्या ‘सय’ नामक आत्मचरित्राचे प्रकाशन झाले. या पार्श्वभूमीवर त्यांनी ही मुलाखत दिली. यावेळी ‘मीटू’ मोहिमेबद्दल बोलताना, त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले.
पुण्यातील किळसवाणा अनुभव –
सई परांजपे यांचे लहानपण पुण्यात गेले.  त्यांनी मुलाखतीदरम्यान पुण्यातील वाईट अनुभव सांगितला त्या म्हणाल्या “मी लहानपणीचं लैंगिक गैरवर्तनाचा किळसवाणा अनुभव घेतला. पुण्यात सायकलवरून जात असताना  एका रोड रोमिओने भररस्त्यात माझी छेड काढली होती. पोलिस ठाण्यापर्यंत त्याने माझा पिच्छा पुरवला होता. मला याविरोधात पोलिसात जायचे होते. पण दुसऱ्या सकाळी पोलिसांत तक्रार दाखल न करण्याचा सल्ला मला देण्यात आला होता”.
#MeToo बाबत बोलताना त्या म्हणाल्या, ” लैंगिक गैरवर्तनाचे अनुभव मलाही आलेत. अनेकांनी माझे बळजबरीने चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. एका माजी केंद्रीय मंत्र्याने तर मला एका रात्रीसाठी विचारणा केली होती, असा धक्कादायक खुलासा सई परांजपे यांनी केला. तथापि या केंद्रीय मंत्र्याच्या नावाचा खुलासा करणे त्यांनी टाळले. ते मंत्री सध्या हयात नाही, केवळ एवढेच त्यांनी सांगितले.
सिनेसृष्टीतील अनेक पुरूषांची बळजबरीने माझे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला होता. एका केंद्रीय मंत्र्याने मला एका रात्रीसाठी विचारले होते. कार्यक्रमातून निघाताना या केंद्रीय मंत्र्याने मला घरी सोडून देण्याची इच्छा व्यक्त केली. मी त्याच्यासोबत निघाले. पण यादरम्यान माझ्यासोबत एक रात्र घालवशील का, अशी विचारणा करणारी चिठ्ठी त्यांनी मला दिली. मी त्यांना यासाठी स्पष्ट नकार दिला, असेही सई परांजपे यांनी सांगितले.
‘मीटू’ मोहिमेअंतर्गत अनेक महिला आवाज उठवताना दिसत आहेत. पण ही मोहिम केवळ तात्पुरती नसावी. यातून काहीतरी ठोस निष्पण्ण व्हावे, असेही त्या म्हणाल्या.