साई संस्थानानं केली कर्मचार्‍यांच्या वेतनामध्ये ‘कपात’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोनामुळे अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. त्याशिवाय लॉकडाउन असल्यामुळे तीर्थस्थळांच्या भेटीला भाविक येत नसल्यामुळे दान कमी झाले आहे. त्यापार्श्वभूमीवर देशातल्या श्रीमंत देवस्थानापैकी असलेल्या साईबाबा संस्थानने अत्यावश्यक सेवा देणार्‍या कर्मचार्‍यांची 40 टक्के पगार कपात केली आहे. अगोदरच तुटपूंज्या पगारावर जिव धोक्यात घालून काम करणार्‍या नर्सिंग स्टाफसह सुरक्षा कर्मचारी यामुळे आर्थिक संकटात सापडले आहेत.

देशातील सर्वात मोठे आणि श्रीमंत म्हणून गणल्या जाणार्‍या शिर्डीच्या साई मंदीर प्रशासनाने साईसंस्थानच्या रूग्णालयात आणि इतर ठिकाणी सेवा देणार्‍या कंत्राटी कर्मचार्‍यांची 40 टक्के वेतन कपात केली आहे. मुळातच तुटपूंज्या पगारावर अनेक वर्षापासून परिसरातील सुशिक्षित तरुण-तरुणी सेवा इथे देत आहेत. कर्मचार्‍यांच्या खांद्याला खांदा लावून हे सर्वजण जिवापाड मेहनत करत आहेत मात्र, त्याचा मोबदला त्यांना दिला जात नाही.

अनेक वर्ष वादानंतर जानेवारी महिन्यात कंत्राटी कर्मचार्‍यांना 40 टक्के वेतनवाढ दिली गेली होती. त्यामुळे हजारो कर्मचारी सुखावले होते. मात्र, आता त्यांच्या आनंदावर विरझण पडले आहे. कोरोनाच्या या संकटकाळात साईबाबा संस्थानने कर्मचार्‍यांची 40 टक्के वेतनवाढ कमी केल्याने हजारो कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत. जे कर्मचारी घरी आहेत त्यांचा पगार कमी करणे ठीक आहे मात्र, आम्ही दिवसरात्र करूनही आमची पगार कपात का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. साईसंस्थानच्या दोन्ही हॉस्पिटलसह नव्याने सुरू करण्यात आलेल्या क्वारंटाइन सेंटर आणि आता कोरोना केअर सेंटरसारख्या अत्यावश्यक ठिकाणी काम करणार्‍यांचे पगार कमी केल्याने आता आम्ही जगायचे कसे असा प्रश्न कर्मचार्‍यांनी उपस्थित केला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like