बीडकरांची मागणी ! साईबाबा ‘इथं’ नोकरीला होते, कर्मभूमी म्हणून 100 कोटींचा निधी द्या

बीड : पोलीसनामा ऑनलाईन : श्री साईबाबा जन्मस्थळावरुन शिर्डी आणि पाथरी यांच्यात वाद पेटलेला होता. आता या वादात बीडच्या नागरिकांनी उडी घेतली आहे. बीडकरांचे म्हणणे आहे की साईबाबा पाथरीहून शिर्डीला जात असताना काही काळासाठी ते बीडमध्ये वास्तव्यास होते. आणि विशेष म्हणजे बीडमध्ये त्यांनी काही काळ नोकरी केली होती असा दावा बीडकरांनी केला आहे. त्यामुळे साईबाबांची कर्मभूमी म्हणून बीडच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी १०० कोटींचा निधी देण्यात यावा अशी मागणी बीडमधील साईभक्तांनी लावून धरली आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना बीडचे साईभक्त पाटणकर यांनी सांगितले की, साईचरित्रात साईबाबा बीडमध्ये वास्तव्यास असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. मौखिक परंपरेनुसार आमचे वडील जनार्दन महाराज पाटणकर यांनी देखील सांगितलं होतं की, साईबाबा हे बीडमधील एका हातमागाच्या दुकानाता कामाला होते. साईबाबा जवळपास ४ ते ५ वर्षापर्यंत या कामासाठी बीडमध्ये होते. तसेच इंग्रजांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले आणि त्यांना एक पगडी सुद्धा भेट म्हणून दिली होती.

किर्तनकार भरतभाऊ रामदासी यांनी देखील सांगितले की, साईबाबा हे एक फकीर असून ते अवलिया संत होते, असे संत एकाजागी कधी थांबत नसतात. साईबाबांचा जन्म पाथरीत झाला असून एका अवलिया गुरुसोबत ते फिरत फिरत बीडमध्ये आले होते. असा उल्लेख दासगणू महाराजांच्या ग्रंथात करण्यात आला आहे. साईबाबांचे गुरु केशवराज बाबासाहेब महाराज हे होते आणि ते त्यांना सेलू येथे भेटले होते. येथेच त्यांनी आध्यात्मिक शिक्षण घेऊन पुढे शिर्डीला गेले. तेथे त्यांची भेट म्हाळसापतींसोबत झाल्यावर त्यांनी म्हाळसापतींना सांगितले की मी ब्राम्हणकुळात जन्माला आलो असून माझा जन्म पाथरीत झाला आहे आणि याबाबत तसा उल्लेख देखील आढळतो. दरम्यान शिर्डीत साईबाबांच्या लोकप्रियतेमुळे आर्थिक स्त्रोत खूप झाला मात्र पाथरी उपेक्षितच राहिली. साईबाबांचा पाथरीत जन्म झाला ही वस्तूस्थिती आहे असं देखील त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान शिर्डीत मोठ्या प्रमाणात अर्थकारण आहे. साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक गर्दी करत असतात आणि मोठ्या श्रेद्धेने साईभक्त साईचरणी नतमस्तक होत असतात. त्यामुळे आता पायी दिंडी शिर्डीला काढण्याऐवजी बीड ते पाथरी काढण्यात यावी असा विचार करणार आहोत. पाथरीला १०० कोटी दिले तसेच आम्हालाही १०० कोटी रुपये देण्यात यावेत कारण साईबाबा यांची कर्मभूमी ही बीड आहे अशी मागणी बीडमधील साईभक्तांनी केली आहे.

फेसबुक पेज लाईक करा –