सायना नेहवालनं केला मोठा आरोप, म्हणाली – ‘पैशांसाठी खेळाडूंच्या जीवाशी खेळले’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय बॅडमिंटन स्टार सायना नेहवालने क्रीडा प्रशासकांवर कोरोना विषाणूची साथ असूनही गेल्या आठवड्यात ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप सुरू ठेवण्यासाठी खेळाडूंच्या सुरक्षिततेपेक्षा आर्थिक लाभाला प्राधान्य दिल्याचा आरोप केला आहे. सायनाने ट्वीट केले की, ‘मला फक्त इतकेच वाटते की खेळाडूंच्या सुरक्षा आणि भावनांपेक्षा आर्थिक हितांना जास्त महत्त्व दिले गेले. याखेरीज गेल्या आठवड्यात ऑल इंग्लंड ओपन २०२० सुरू ठेवण्याला अजून दुसरे कोणतेही कारण नव्हते.’

पहिल्या फेरीत बाद झाली होती सायना
ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप स्पर्धेच्या पहिल्या फेरीत सायना नेहवालचा पराभव झाला. कोरोना विषाणूमुळे बर्‍याच क्रीडा स्पर्धा जगभरात तहकूब झाल्या पण ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा सुरूच होती. ही स्पर्धा संपल्यानंतर वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशनने आपल्या सर्व स्पर्धांवर बंदी घातली होती.

बर्मिंघम मध्ये झालेल्या या ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत सायना सहित पीव्ही सिंधूने देखील भाग घेतला होता. पीव्ही सिंधूने उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. के. श्रीकांत, अश्विनी पोनप्पा, एन. सिक्की रेड्डी आणि प्रणव चोप्रा यांनीही ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला. त्याच वेळी एचएस प्रणॉय, चिराग शेट्टी, साईराज, समीर वर्मा, सौरभ वर्मा यांनी कोरोना विषाणूमुळे स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला होता.

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूमुळे ७० पेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत आणि म्हणूनच सायना नेहवालने ऑल इंग्लंड स्पर्धा सुरू ठेवण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.