चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्याचं आईकडून वर्षश्राद्ध, गट्टेपल्लीत बांधली समाधी

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाईन – मागच्या वर्षी गडचिरोली येथे पोलीसांशी झालेल्या चकमकीत ४० नक्षलवादी ठार झाले होते . यामध्ये मारला गेलेला नक्षली साईनाथ उर्फ डोलेश मादी आत्राम याची चक्क समाधी बांधण्यात आलेली आहे. अहेरी तालुक्यात गट्टेलपट्टी या गावात त्याची हि समाधी बांधण्यात आली आहे . त्याची आई तानी मादी आत्राम हिने हि समाधी बांधली आहे . नुकतंच तिने साईनाथचं वर्षश्राद्धही घातलं. विशेष म्हणजे पत्रिका छापून लोकांना यासाठी आमंत्रण देखील देण्यात आले होते. या घटनेतून कुटुंबातल्या एखाद्या दिवंगत व्यक्तीविषयी अशा प्रकारे प्रेम व्यक्त केलं असलं तरी गेल्या काही दिवसांपासून घडणाऱ्या घटना लक्षात घेता यातून नक्षलवादाला प्रोत्साहन तर मिळत नाही ना? असा प्रश्नही उपस्थित होतोय.यामुळे नक्षलींच्या उद्दात्तीकरणाला चालना मिळण्याची शक्यता तयार होते.

दरम्यान याआधीही अश्या प्रकारच्या समाधी बांधण्याचा प्रयत्न केला होता. काही स्वयंसेवी संस्थांनी ग्रामस्थांच्या मदतीने उध्वस्त करण्याचा प्रयत्न देखील केला होता . मात्र पुन्हा एकदा यामुळे पोलिसांपुढे आव्हान उभे राहिले आहे. काल एटापल्ली तालुक्यात घोटसुर इथं दोन वाहनांची जाळपोळ करण्यात आली होती. रस्ता बांधकामाला नक्षल्यांचा किती विरोध सुरू आहे, हे अलीकडच्या घटनांवरून दिसून आलं.