‘सैराट’चा ‘परश्या’ आकाश ठोसर आता साकारणार सैनिकाची भूमिका ! ‘या’ सीरिजमध्ये झळकणार अभिनेता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सैराट (Sairat) सिनेमात परशाची भूमिका साकारणारा अभिनेता आकाश ठोसर (Akash Thosar) लवकरच एका वेब सीरिजमधून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. 1962 : द वॉर इन द हिल्स असं या वेब सीरिजचं नाव आहे. या सीरिजमध्ये आकाश प्रमुख भूमिकेत आहे. महेश मांजरेकर डायरेक्टेड या सीरिजमध्ये अक्षय देओल आणि सुमित व्यास हे कलाकारही असणार आहेत.

याबाबत बोलताना आकाश म्हणाला, सैन्यात दाखल होण्याचं माझं लहानपणापासूनचं स्वप्न होतं. त्यासाठी मी दोन वेळा परीक्षाही दिली होती. पोलीस दलात काम करण्यासाठीही मी प्रयत्न केला होता. परंतु अभिनयाचा योगायोग आयुष्यात असल्यानं सैन्यदल स्वप्नच राहिलं. मी जर ॲक्टर झालो नसतो तर निश्चितच देशाच्या संरक्षणासाठी कार्यरत असतो.

मला पहिल्यांदाच सैनिकाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. आनंद आणि अभिमानानं माझा उर भरून आला आहे. त्यांचा पोषाख परिधान करण्याचा क्षण माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे असंही तो म्हणाला.

सीरीजबद्दल बोलायचं झालं तर या सीरिजची कथा ही वास्तविक घटनांवर आधारीत आहे. भारत आणि चीन दरम्यान झालेल्या युध्दाच्या पार्श्वभूमीचीही झलक यात पहायला मिळणार आहे. आकाश यात भारतीय जवानाची भूमिका साकारत आहे. येत्या 26 फेब्रुवारी रोजी डिज्नी प्लस हॉटस्टारवर ही सीरिज रिलीज होणार आहे.