ऑडिशन देते का ? असा सुरू झाला आर्चीचा प्रवास, सैराटला 4 वर्ष पुर्ण

पोलिसनामा ऑनलाईन – आर्ची आणि परश्याच्या प्रेमाने सैराट झालेला क्षण कित्येक प्रेक्षकांच्या मनात आवाज न करता शिरली. त्यामुळेच सेलिब्रिटी कलाकारांपासून ते सामान्य माणसांपर्यंत प्रत्येकाने ‘सैराट’ पाहिल्यानंतरची अस्वस्थता या ना त्या माध्यमातून मोकळी केली आहे. आज या चित्रपटाला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. ज्या प्रकारे पहिली नोकरी, पहिले घर, पहिला मोबाईल हे सर्वांसाठीच फार खास असते त्याचप्रकारे एका कलाकारासाठी त्याचा पहिला चित्रपटसुद्धा तितकाच खास असतो. ‘ अवघ्या तेराव्या वर्षापासून तिचा हा प्रवास सुरू झाला. आजही ऑडिशनचा तो दिवस स्पष्ट आठवत असल्याचे रिंकूने सांगितले आहे.

मी एकदम कावरीबावरी होते, काहीच कळत नव्हते. सरळ गेले आणि तिथे जाऊन विचारले की नागराज मंजुळे कुठे आहेत? माझ्या शेजारीच एक दाढीवाला माणूस उभा होता. तो माझ्याकडे बघत होता. नंतर तोच म्हणाला की ऑडिशन देते का? मी त्याला विचारले हे ऑडिशन काय असते? तेव्हा मला समजले की तेच नागराज मंजुळे आहेत; आजही तितक्याच निरागस भावनेने तिने पहिल्या भेटीला किस्सा सांगितला. त्याआधी रिंकूने वर्तमानपत्रात त्यांचे नाव वाचले होते. योगायोगाने तिने ऑडिशनमध्ये देवा श्रीगणेशा या अजय-अतुलच्या गाण्यावर डान्स करून दाखवला. नंतर तिच्या पहिल्याच चित्रपटासाठी हीच लोकप्रिय जोडगोळी संगीत देणार असल्याची पुसटशीही कल्पना तिला तेव्हा नव्हती.

नागराज मंजुळेंनी रिंकूमधला अभिनयाचा किडा अचूकपणे वेधला होता. म्हणूनच त्यांनी नवोदित कलाकारांना यात पूर्ण विश्वासाने संधी दिली होती. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यांनी रिंकूला सांगितले होते की तुला राष्ट्रीय पुरस्कार नक्की मिळेल. तेव्हा रिंकूला त्यावर विश्वासच बसत नव्हता. ‘हे उगाच आपली मस्करी करत आहेत’, असे तिला वाटले होते. पण जेव्हा टीव्हीवर पुरस्कारासाठी नाव जाहीर झाले तेव्हा ती ढसाढसा रडू लागली होती. राष्ट्रीय पुरस्कार जाहीर होणार होते तेव्हा नागराज मंजुळे खूप आतुरतेने टीव्हीसमोर जाऊन बसले होते. जेव्हा घोषणा झाली तेव्हा मात्र माझ्या अश्रूंना आवरणे कठीण होते; अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या.