सालासर हनुमान चालीसा मंडळाद्वारे रक्तदान शिबिराचे आयोजन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील सालासर हनुमान चालीसा मंडळाद्वारे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी या शिबिराचे आयोजित करण्यात येते. मागील वर्षी या रक्तदान शिबिरामध्ये ७८३ रक्ताच्या बाटल्यांचे संकलन करण्यात आले होते. मंडळ दरवर्षी आर. सी. एम गुजराथी हायस्कुल येथे हे शिबीर भरवते परंतु, येणाऱ्या १५ व्या लोकसभेचे हे मतदान केंद्र असल्यामुळे यंदा ठिकाण बदलून श्री. गाडगे महाराज धर्मशाळा, नरपतगिर चौक, के. इ. एम हॉस्पिटलजवळ, सोमवार पेठ येथे भरवण्यात येणार आहे. दरम्यान, या शिबिराला सर्वानी उपस्थिती लावून रक्तदान करावे आणि मंडळाच्या या विधायक कार्यात हातभार लावावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

गेल्या १२ वर्षांपासून महाशिवरात्री ते हनुमान जयंतीपर्यंत दररोज पुणे शहर व परिसरात ११ आवर्तनांचा सामुदायिक पाठाचे पठण करते. या वर्षी महाशिवरात्रीला भिकारदास मारुती येथे मोठ्या धुमधामात याची सुरुवात झाली. मंडळातर्फे दगडूशेठ मंदिर, महालक्ष्मी मंदिर सारसबाग, अंबामाता मंदिर सुखसागरनगर अशा अनेक ठिकाणी याचे पठण मोठ्या उत्साहात पार पडले. मंडळात मोठ्या प्रमाणावर युवा तरुणांचा सहभाग असून मोठ्या धार्मीकतेने अनेक सामाजिक उपक्रम मंडळ राबवत असते. या पाठाच्या माध्यमातून जमा होणारी धनराशी विविध गरजू सामाजिक वा वैयक्तिक स्वरूपात मदत करतात. तसेच आषाढी वारीत येणाऱ्या पालखीच्या स्वागतानिम्मित दिवे घाटाच्या माथ्यावरती मंडळातर्फे दरवर्षी वारकऱ्यांच्या सेवेसाठी शास्त्रोक्त पद्धतीचे मसाज केंद्र शिबिराचे आयोजन करण्यात येते.

दिवाळीच्या पावनपर्वावर समाजात सर्वत्र अन्नकोटची धूम असते. मंडळातर्फे या शुभप्रसंगी मागील ३ वर्षांपासून या परंपरेला छेद देत ‘गौ-अन्नकोट’ या अनोख्या संकल्पनेतून गो सेवेचे व्रत हाथी घेतले. या कार्यक्रमाअंतर्गत मंडळातर्फे संपूर्ण महाराष्ट्रातील विविध गरजू गो शाळांना धान्यरूपाने मदत केली जाते. तसेच उन्हाळ्यात जाणवणाऱ्या भीषण रक्त तुटवड्यावर मात करण्यासाठी मंडळ भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करते. मोठ्या प्रमाणावर बांधव यात सहभागी होतात.