म्हाडाच्या मध्यम उत्पन्न गटातील 49 सदनिकांसाठी अर्ज विक्री, स्वीकृतीला प्रारंभ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – म्हाडाच्या (Mhada) नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास महामंडळातर्फे निसर्गरम्य आडगांव शिवारातील श्रीराम- कोणार्क नगर येथे मध्यम उत्पन्न गटातील 49 सदनिकांच्या (Flats) विक्रीसाठी अर्ज (Application) विक्री (Sale) व स्वीकृतीला प्रारंभ झाला आहे. म्हाडाच्या नाशिकच्या कार्यालयात या अर्जांची विक्री आणि स्विकृतीला प्रारंभ झाला असून 14 जानेवारी 2021 पर्यंत हे अर्ज स्विकारले जाणार आहेत.

येथे होणार अर्ज विक्री आणि स्विकृती
एक रक्कमी खरेदी तत्वावर विक्री केल्या जाणाऱ्या या अत्याधुनिक सुविधांसह युक्त सदनिकांसाठी पात्र अर्जदारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. हे अर्ज म्हाडा नाशिक मंडळाच्या गृहनिर्माण भवन, राम गणेश गडकरी चौक, आयकर भवन येथील मिळकत व्यवस्थापक यांच्या कार्यालयात मिळणार आहेत. अर्ज विक्रीची मुदत 13 जानेवारी 2021 पर्यंत कार्यालयीन दिवशी व वेळेत विक्री होणार आहे. तर 14 जानेवारी 2021 पर्यंत हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

या दिवशी होणार सोडत
प्राप्त झालेल्या अर्जांची सोडत 27 जानेवारी 2021 रोजी म्हाडा नाशिक मंडळाच्या कार्यालयात होणार आहे. मध्यम उत्पन्न गटाकरिता 60.36 चौरस मीटर पासून 61.69 चौरस मीटर पर्यंत क्षेत्रफळाच्या या सदनिका 22 लाख 50 हजार रुपये ते 22 लाख 90 हजार पर्यंत अर्जदारांना उपलब्ध होणार आहेत. सोडतीत सहभागी होण्याकरिता अर्जदाराचे मासिक कौटुंबिक उत्पन्न 50001 ते 75 हजार पर्यंत असणे आवश्यक आहे.

सदनिकेची वैशिष्ट्ये
बैठक खोली, स्वयंपाक खोली, 2 शयनकक्ष (एकास अटॅच टॉयलेट) बाल्कनी, 1 स्वतंत्र अटॅच टॉयलेट बाथरूम, ग्रिलसह अल्युमिनियम खिडक्या, व्हिट्रीफाइड टाईल्स ही सदनिकेची वैशिष्ट्ये आहेत. याशिवाय पार्किंग, सात मजली आर सी सी इमारत, तीन लिफ्ट, प्रशस्त जिने, फायर फायटिंगची सुविधा, तळमजल्यावर सामायिक कव्हर्ड पार्किंग, सामायिक कंपाऊंड वॉल.

या सोडतीत समाविष्ट करण्यात आलेल्या सदनिकांच्या वाटपासंदर्भात सविस्तर अटी व शर्ती म्हाडा नाशिक मंडळाच्या कार्यालयात उपलब्ध होतील, अशी माहिती नाशिक मंडळाच्या मुख्य अधिकारी मनीषा जायभाये यांनी दिली.