बाजारात येऊ शकते ‘कोरोना’ची ‘बनावट’ लस, तज्ञांनी दिला इशारा

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोनाच्या बनावट लसी बाजारात विकल्या जाऊ शकतात. कोरोनाच्या लसीची विक्री जाहीर होताच काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक बनावट लस बाजारात आणू शकतात. ब्रिटनच्या नॅशनल क्राइम एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी हा इशारा दिला आहे. independent.co.uk च्या अहवालानुसार, फेक कोरोना लसीची विक्री रोखण्यासाठी ब्रिटनच्या अधिकाऱ्यांनी कारवाई देखील सुरू केली आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की साथीच्या सुरुवातीच्या काळात गुन्हेगारांनी बनावट पीपीई वगैरे विक्रीचा प्रयत्नही केला होता.

ब्रिटनच्या नॅशनल क्राइम एजन्सीच्या इकॉनॉमिक क्राइम सेंटरचे डायरेक्टर जनरल ग्रेएम बिगर यांनी असे म्हटले आहे की लसीसंदर्भात फसवणूक केली जाण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. ते म्हणाले की लस तयार होताच लोकांना बनावट लस देणाऱ्या टोळ्या सक्रीय होतील. हे थांबविण्यासाठी आम्ही आधीपासूनच तयारी करीत आहोत.

प्रमुख ब्रिटिश अधिकाऱ्याने सांगितले की, गुन्हेगारांची टोळी कोरोना विषाणूशी संबंधित अनेक गुन्हेगारी घटना घडवून आणत आहे. बनावट कोरोना टेस्ट विक्री करण्याचा प्रयत्नही करण्यात आला होता. यापूर्वी अमेरिका आणि ब्रिटनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते की लस उत्पादनाशी संबंधित असलेल्या अनेक संस्थांवर हॅकर्सनी हल्ला केला आहे. लस संबंधित माहिती चोरण्याच्या उद्देशाने हॅकर्सनी हे हल्ले केले होते.

फायझर, ऑक्सफोर्ड आणि नोव्हाव्हॅक्ससह अनेक कंपन्यांच्या लसी अंतिम टप्प्यात आहेत. अशी आशा आहे की काही महिन्यांत या लसी बाजारात येऊ शकतात. फायझर कंपनीने अलीकडेच दावा केला आहे की 90 टक्के लोकांमध्ये लस प्रभावी असल्याचे दिसून आले आहे.