बंदच्या काळातही करंदीमध्ये दारूची विक्री; शिक्रापुर पोलिसांच्या छाप्यात तब्बल 2889 दारूच्या बाटल्या जप्त

शिक्रापूर : पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्याच्या करंदी येथील एका हॉटेलच्या कडेला एका खोलीमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमी प्रशासनाने लावलेल्या कडक निर्बंधाच्या काळात देखील बेकायदेशीरपणे देशी विदेशी दारूच्या बाटल्यांची विक्री सुरु असलेल्या ठिकाणी छापा टाकत शिक्रापुर पोलिसांनी मोठी कारवाई केली.यामध्ये तब्बल एक लाख सात हजार रुपयांची दारू जप्त करत दारू विक्री करणाऱ्या मंगेश बाळासाहेब ढोकले या इसमावर गुन्हे दाखल केले आहे.

याबाबतीत मिळालेल्या माहिती नुसार करंदी ता. शिरूर येथील एका हॉटेलच्या कडेला असलेल्या एका खोलीमध्ये कोरोनाच्या संकटामुळे प्रशासकीय निर्बंध असताना देखील एक इसम देशी विदेशी दारूची विक्री करत असल्याची माहिती शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांना मिळाली, त्यांनतर पोलीस उपनिरीक्षक किरण भालेकर, पोलीस हवालदार काशिनाथ गरुड, आजिनाथ शिंदे, पोलीस शिपाई विकास मोरे यांनी करंदी फाटा येथील हॉटेल किनाराच्या कडेला जाऊन तेथील खोलीमध्ये छापा टाकला असता त्यांना त्या ठिकाणी एक इसम जवळ दारूचे बॉक्स घेऊन बसलेला दिसून आले, दरम्यान पोलीस आल्याची चाहूल लागताच त्या ठिकाणी दारू विक्री करणारा सदर युवक पळून जाऊ लागला यावेळी पोलिसांनी त्याला जागेवर पकडत त्याच्या जवळील तब्बल एक लाख सात हजार रुपये किमतीच्या दोन हजार आठशे ऐकोननव्वद बाटल्या जप्त केल्या आहे, याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई विकास बाळासाहेब मोरे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी मंगेश बाळासाहेब ढोकले वय ३० वर्षे रा. करंदी ता. शिरूर जि. पुणे यांचे विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आजिनाथ शिंदे हे करत आहे.