पुण्यात दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी ‘पेट्रोल-डिझेल’ विक्री बंद !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसवर प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषांगाने पुणे शहरात दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांना पेट्रेल-डिझेलची विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज (मंगळवार) काढले आहेत.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी यासंदर्भात आदेश काढून जिल्हा पेट्रोल-डिझेल असोसिएशनला कळविलेले आहे. या पेट्रोल बंदीमधून अत्यावश्यक सेवेवर कार्यरत असणारे सर्व अधिकारी आणि कर्मचारी, कोरोना नियंत्रण व निर्मुलनासाठी कार्य करणार्‍या खासगी व्यक्ती, अत्यावश्यक वस्तु व सेवा संदर्भात कार्य करणारी खाजगी व्यक्ती, वैद्यकीय उपचार किंवा सहाय्याची गरज असणारी व्यक्ती यांना सुट देण्यात आली आहे. तरी देखील, सुट देण्यात येणार्‍यांनी त्यांच्या वाहनाची टाकी एकदाच पुर्णपणे भरून घ्यावी असे आदेश देखील काढण्यात आले आहेत.