दुर्देवी ! 3 मुलांचं पोट भरण्यासाठी तिनं आपले केस विकले

सेलम/तामिळनाडू : वृत्तसंस्था – कर्जात बुडालेल्या पतीने आत्महत्या केल्यानंतर तीन मुलांचे पोट कसे भरायचे हा प्रश्न आईसमोर होता. अखेर त्या माऊलीने आपले डोक्यावरचे केस विकून आपल्या तीन मुलांचे पोट भरले. तामिळनाडू मधील सेलममध्ये राहाणाऱ्या 31 वर्षीय महिलेवर ही वेळ आली. पतीचे सेल्वमकडे असलेले जे काही पैसे होते ते देखील शुक्रवारी संपले. प्रेमाकडे जगण्यासाठी एक पैसाही शिल्लक नव्हता. त्यातच तीन लहान मुलं. एक मुलगा पाच वर्षाचा, दुसरा तीन तर तिसरा दोन वर्षाचा. या कठिण परिस्थितीमध्ये या तीन लहान बाळांचे पोट कसे भरायचे हे मोठं आव्हान तिच्यासमोर होते. तिने नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांकडे मदतीची याचना केली. मात्र, तिच्या मदतीला कोणीही धावून आले नाही.
प्रेमा आणि तिचा पती सेल्वम हे एका वीटभट्टीवर रोजंदारीने काम करत होते. सेल्वमला छोटासा व्यवसाय सुरु करायचा होता. त्यामुळे त्याने अडीच लाख रुपयाचे कर्ज घेतले. पण त्यात त्याची फसवणूक झाली आणि संपूर्ण कुटुंब रस्त्यावर आले.

कर्जात बुडालेल्या सेल्वमला फसवणूक झाल्याने मोठा धक्का बसला. यातूनच त्याने आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले आणि आपले आयुष्य संपवले. मात्र, सेल्वमने ज्यांच्याकडून कर्ज घेतले होते त्या व्यक्तींनी प्रेमाकडे कर्जाच्या पैशासाठी तगादा लावला. त्यामुळे तिनेही आपले आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. मुले उपाशी असल्याने त्यांनी आईकडे खाण्यास मागितले. मात्र, तिच्याकडे पैसे नसल्याने ती हतबल झाली होती. दरम्यान, रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीने विगसाठी तिचे केस मागितले. या केसांच्या मोबदल्यात त्याने तिला 150 देण्याचे मान्य केले.

मुलांचे पोट भरण्यासाठी या माऊलीने त्याला होकार देत आपले केस 150 रुपयात त्या व्यक्तीला विकले. मिळालेल्या 150 रुपयापैकी 100 रुपयांचे खाद्यपर्थ मुलांसाठी घेतले. यानंतर ती कीटकनाशक घेण्यासाठी दुकानात गेली. पण त्या दुकानदाराला संशय आल्याने त्याने किटनाशकाची बाटली देण्यास नकार दिला.निराश झालेल्या प्रेमाने विषारी बिया खावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण तिच्या बहिणीने तिला आडवलं. मन हेलावून टाकणारी प्रेमाची ही कथा जी. बाला या ग्राफिक्स डिजायनरने सोशल मीडियावर पोस्ट केली. ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आणि प्रेमाला मदतीचा ओघ सुरु झाला. आत्तापर्य़ंत तिला 1 लाख 45 हजार रुपयांची मदत मिळाली आहे. तसेच सेलम जिल्हा प्रशासनाने प्रेमाला विधवा महिलांना देण्यात येणारी महिन्याची पेन्शन लागू केली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/