पुण्यात ‘सॅनिटायझर’ आणि ‘मास्क’ची वाढीव दरानं विक्री, ‘या’ 4 मेडिकल स्टोअर्सवर ‘कडक’ कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असून कोरोना व्हायरसचे एकूण 9 रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांवर उपचार सुरु असून या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहीती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. करोनाचा संसर्ग वाढत असल्याने एमआरपीपेक्षा अधिक दराने मास्क आणि बोगस सॅनिटायझरची विक्री करणाऱ्या पुण्यासह म्हाळुंगे येथील चार औषध विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. पुढील आदेश येईपर्य़ंत दुकान बंद ठेवण्याचे आदेश अन्न आणि औषध प्रशासनाने दिले आहेत. तसेच जादा दराने विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

एफडीआयचे सहआयुक्त सुरेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मास्क आणि सॅनिटायझरची मागणी वाढली आहे. त्यामुळे जादा दराने मास्कची आणि सॅनिटायझरची वाढीव दराने विक्री करून नागरिकांची लूट करत असल्याचे निदर्शनास आले होते. तसेच या संदर्भात नागरिकांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रारीही केल्या आहेत. या तक्रीरीची गंभीर दखल घेऊन अनेक मेडीकल स्टोअर्सवर छापा टाकण्यात आला.

बनावट उत्पादनेही विकली जात असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर अन्न व औषध विभागाने कारवाईसाठी पथकाने चार मेडिकल स्टोअर्सला टाळं ठोकलं आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात आतापर्यंत तब्बल 165 मेडिकल्सची तपासणी करून त्यापैकी कोथरूड परिसरातील न्यु पूजा मेडीकल आणि मेट्रो मेडिकल तर गोखले नगर परिरातील ओम केमिस्ट आणि म्हाळुंगे येथील महालक्ष्मी मेहिडीक या चार मेडिकल्सना खरेदी-विक्री करण्याचे निर्बंध घालण्यात आले आहेत.

अशा वाढीव दराने कोणी मास्क आणि सॅनिटाझरची विक्री करत असल्यास त्यांनी त्वरित अन्न व औषध विभागाशी संपर्क साधावा. संबंधित मेडिकलवर छापा टाकून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे सहआयुक्त सुरेश पाटील यांनी सांगितले.