तरुणांच्या मदतीने शेतकर्‍याची 35 टन द्राक्षांची विक्री

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनामुळे शेतकर्‍याचे मोठे नुकसान झाले असून, खरबूज, कलिंगड बागा कवडीमोल दराने द्याव्या लागत आहेत. फळे आणि भाजीपाल्याचे दर कोसळल्याने शेतकरी हतबल आहेत. अशातच सेलू तालुक्यातील गुगळी धामणगाव येथील शेतकरी नामदेव डख यांनी तरुणांच्या मदतीने बागेतील 35 टन द्राक्षांची विक्री केली. यात संबंधित शेतकर्‍याचाही फायदा झाला आणि ग्रामीण भागातील तरुणांनाही काही दिवस रोजगार मिळाला.

लॉकडाउनमुळे बाजार सुरु नसल्यामुळे फळे आणि भाजीपाला शेतात सडत आहे. त्यामुळे लागवडखर्चही भरून निघत नसल्याचे विदारक चित्र असून शेतकर्‍याने उत्पादन ते विक्री असा टप्पा यशस्वी केला आहे. शेतकरी नामदेव डख यांची पाच एकर द्राक्षाची बाग आहे. मोठया प्रमाणात खर्च करून बागेचे संवर्धन त्यांनी केले. द्राक्षाचे पीक आल्यानंतर व्यापार्‍यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दळणवळणात अडथळे येत असल्याने द्राक्षाचा भाव पाडून मागितला. व्यापार्‍यांच्या म्हणण्यानुसार 15 ते 20 रुपये किलोप्रमाणे द्राक्ष विकावी लागली असती. मात्र त्यांनी सुरुवातीला गावातील काही तरुणांना एकत्र केले.

‘द्राक्षे  कण्यासाठीचे कॅरट मी तुम्हाला घेऊन देतो, तुम्ही सुरुवातीला मला रोख पैसे देण्याची गरज नाही. वीस रुपये किलो या दराप्रमाणे मी तुम्हाला द्राक्ष देईन. तुम्ही द्राक्षे विका आणि त्यातून तुमचे पैसे कपात करून मला माझी रक्कम द्या,’ असे त्यांनी सांगितले. दुचाकी असलेल्या तरुणांनी ही द्राक्षे आसपासच्या परिसरात फिरून 50 ते 60 रुपये किलोने विकली. किलोमागे किमान 20 रुपये त्यांना मिळाले. या पद्धतीने दिवसभरात प्रत्येक तरुणाने दररोज 800 ते 1000 रुपये कमावले. सुरुवातीला गावातले तरुण या प्रतिक्रिया येत सहभागी होते.

मग दहा ते पंधरा किलोमीटर परिसरातील इतर गावांमधूनही आणखी काही तरुण जोडले गेले. पाच एकरात जवळपास 35 टन द्राक्षे डख यांनी तरुणांमार्फत विकली. विशेष म्हणजे सर्व द्राक्षांची विक्री केल्यानंतर या तरुणांनी आता आजूबाजूच्या शेतकर्‍यांकडून इतर फळे घेऊन तीही आपापल्या परिसरात विकण्यास सुरुवात केला आहे. टोमॅटोपासून टरबूजापर्यंत सर्वच शेतमालाचे भाव कोसळले असताना आणि अनेक ठिकाणी परवडत नाही म्हणून पिके स्वत:हून काढून टाकण्याचा मार्ग शेतकरी हतबल होऊन स्वीकारीत असताना एका प्रयोगशील शेतकर्‍याचे हे द्राक्षविक्रीचे उदाहरण इतर शेतकर्‍यांसाठी ही मार्गदर्शक ठरले आहे.