कंपनी असावी तर अशी ! ‘कोरोना’ काळातही पगारवाढ, बढती आणि नवी नोकर भरती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना महामारीच्या काळात मोठ मोठ्या मल्टी नॅशनल कंपनीत काम करणाऱ्या लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्यात तर काहींच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार आहे. अशात आता भारतातील आघाडीच्या आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या इन्फोसिसनं मात्र कर्माचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी सलील पारेख यांनी एक मोठी घोषणा केली आहे.

इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांना आता कोरोना संकटातही पगारवाढ आणि प्रमोशन मिळणार आहे. इतकंच नाही तर जागतिक स्तरावर मोठी नोकरभरती करण्याचाही विचार कंपनी करत आहे असं सीईओ पारेख यांनी सांगितलं. सध्या कंपनीत 2.4 लाख कर्मचारी काम करत आहेत. कोरोना काळात एप्रिल महिन्यात कंपनीनं पगारवाढ आणि प्रमोशन या संदर्भातील निर्णय स्थगित केला होता.

इन्फोसिसनं एप्रिल महिन्यात म्हटलं होतं की, पगारवाढ आणि प्रमोशन होणार नाही. परंतु ज्या लोकांना नोकरीची ऑफर दिली गेली आहे त्यांना नोकरी नक्की मिळेल. ज्या लोकांना कंपनीचं ऑफर लेटर मिळालं होतं त्यांची भरती सुरू आहे. जून ते सप्टेंबर या तिमाहीत कंपनी फ्रेशर्सना नोकरी देत आहे.

इन्फोसिस शिवाय काँग्निझंट आणि कॅपजेमिनी या कंपन्यांनीही कर्मचाऱ्यांना पगारवाढ आणि प्रमोशन दिलं आहे. पारेख यांनी दिलेल्य माहितीनुसार इन्फोसिस अमेरिकेत 12 हजार नव्या लोकांना नोकऱ्या देणार आहे.