‘भाईजान’ सलमान खान आज जोधपूर कोर्टात हजर राहणार

जोधपूर : वृत्त संस्था – कांकाणी हरण शिकार प्रकरणात शुक्रवारी अभिनेता सलमान खान हा जोधपूर कोर्टात हजर राहणार आहे. याप्रकणी मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यानी सलमान खान याला ५ वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्याविरुद्ध सलमानने जिल्हा सत्र न्यायालयात अपील केले होते. त्याची सुनावणी सत्र न्यायाधीश चंद्रकुमार सोनगरा यांच्या न्यायालयात होणार आहे.

यापूर्वी ४ जुलै रोजी सलमान खान याला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, तो हजर न राहिल्याने त्यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर २७ सप्टेंबरला सुनावणीची तारीख देण्यात आली होती. जर आज सलमान खान न्यायालयात हजर राहिला नाही तर, त्याचा जामीन न्यायालय रद्द करुन त्याच्या अटकेचे आदेश देऊ शकते.

कांकाणी हरण शिकार प्रकरणी सलमान खान याला मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी शिक्षा सुनावली आहे. त्याविरुद्ध सत्र न्यायालयात अपील केल्यानंतर न्यायालयाने सलमान खान याला जामीन मंजूर केला होता. या खटल्याची सुनावणी लांबविण्यासाठी सलमान खान हा वारंवार तारखेला अनुपस्थित राहत आला आहे. त्यासाठी वकिलामार्फत वेगवेगळी कारणे तो दरवेळी सांगत आला होता.

४ जुलैच्या सुनावणीला त्याने वकिलामार्फत माफीनामा सादर करुन आपल्याला आज हजर राहता येत नसल्याचे कळविले होते. त्यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त करुन जर पुढील तारखेला हजर राहिला नाही तर जामीन रद्द करु अशी सक्त ताकीद दिली होती. त्यामुळे आज सलमान खानला न्यायालयात हजर राहावेच लागणार आहे.