अभिनेता सलमानला मारण्यासाठीची रेकी केल्यामुळे शार्प शूटरला अटक

पोलिसनामा ऑनलाईन टीम – अभिनेता सलमान खानच्या हत्येसाठी रेकी करणार्‍या गुन्हेगाराला क्राइम ब्रांचने अटक केली आहे. त्याचे नाव राहुल असून उत्तराखंडमध्ये त्याला अटक केली. अटक केल्यानंतर चौकशीत राहुलने अनेक आरोपांचे खुलासे केले.

आरोपी राहुल उर्फ सांगा याने जानेवारी महिन्यात मुंबईत येऊन सलमानच्या घराची रेकी केली होती, अशी माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली. सलमान घरातून किती वाजता बाहेर पडतो, त्याची दिनचर्या कशी असते याबाबत त्याने माहिती मिळवली होती. कुख्यात लॉरेन्स बिश्नोईने सलमानला जीवे मारण्याची जबाबदारी राहुलला दिली होती.

लॉरेन्स बिश्नोई हा हरयाणा, पंजाब आणि राजस्थानचा कुख्यात गँगस्टर असून त्यानेच सलमानच्या हत्येचा कट रचला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. राहुल हा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या गँगचा शार्प शूटर आहे. लॉरेन्सच्या सांगण्यावरून त्याने सलमानची रेकी केली होती आणि त्यापुढील योजना आखली होती. लॉरेन्स बिश्नोई सध्या जोधपूरच्या कारागृहात आहे. तर राहुलवर अनेक हत्यांचे आरोप आहेत.