सुशांतच्या आत्महत्येमुळं निशाण्यावर आलेल्या ‘भाईजान’ सलमाननं केलं चकित करणारं Tweet !

पोलीसनामा ऑनलाइन –  बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत यानं रविवारी (दि 14 जून 2020) गळफास घेऊन आत्महत्या केली आणि जगाचा निरोप घेतला. अचानक समोर आलेल्या या घटनेनं साऱ्यांनाच हादरून सोडलं. यानंतर आता एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे. या वादावरून आता बिहारच्या न्यायालयात एका वकिलानं बॉलिवूडमधील बडे कलाकार आणि डायरेक्टरविरोधात तक्रारसुद्धा दाखल केली आहे. यासंदर्भात अनेक बातम्याही समोर आल्या आहेत. सुधीर कुमार ओझा असं या वकिलाचं नाव आहे.

फिल्ममेकर करण जोहर, संजय लीला भन्साळी, एकता कपूर, सलमान खान यांच्यासह 8 जणांविरोधात मुझफ्फरनगरच्या न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. आयपीसी मधील 306, 109, 504 आणि 506 कलमंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे असं वकिल सुधीर कुमार ओझा यांनी सांगितलं आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर सलमान खानवर अनेक आरोप होताना दिसत आहेत. अनेकजण त्याला ट्रोल करताना दिसत आहेत. या सगळ्यानंतर आता सलमान खाननं मौन सोडत यावर भाष्य केलं आहे.

सलमान खाननं ट्विट केलंय की, “माझ्या सर्व चाहत्यांना विनंती आहे की, त्यांनी सुशांतच्या चाहत्यांच्या बाजूनं उभं रहावं. त्यांची भाषा किंवा त्यांच्या कोसण्यावर जाऊ नका तर त्यामागील भावना समजून घ्या. कृपया त्याच्या कुटुंबांचं आणि चाहत्यांचं समर्थन करा, त्यांच्या बाजूनं उभं रहा. कारण आपल्या माणसाला गमावणं हे खूप वेदनादायी असतं.”

सध्या सुरू असलेल्या या वादानंतर आणि ट्रोलिंगनंतर एक गट असाही आहे जो सलमान खानला सपोर्ट करत आहे. दुसरा गट तो आहे जो सलमान खानला ट्रोल करत आहे. सुशांतच्या आत्महत्येसाठी त्याला जबाबदार धरत आहे.