हरीण शिकार प्रकरण : सलमान खानला जोधपूर न्यायालतात व्हावे लागेल हजर, न्यायाधीशांनी दिला आदेश

जोधपूर : वृत्तसंस्था – बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानसाठी अडचणी वाढल्या आहेत. कांकाणी हरीण शिकार प्रकरणात सलमान खानला जोधपूर कोर्टात हजर व्हावे लागेल. राजस्थानमधील जोधपूरच्या जिल्हा न्यायालयाने सलमान खानला २८ सप्टेंबर रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. या प्रकरणात सोमवारी जिल्हा न्यायाधीशांनी आदेश जारी केला. सोमवारी झालेल्या सुनावणीत सलमानचे वकील हस्तीमल सारस्वत न्यायालयात हजर होते.

१९९८ मध्ये ‘हम साथ साथ हैं’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सलमान खान आणि त्याच्यासह चित्रपटात काम करणाऱ्या तब्बू, नीलम, सोनाली बेंद्रे आणि दुष्यंत सिंहवर कांकाणी गावात काळ्या हरणाचा शिकार केल्याचा आरोप होता, ज्याबाबत न्यायालयात खटला चालू आहे.

या खटल्यामुळे सलमानला वेळोवेळी कोर्टात हजर व्हावे लागले आणि सुनावणीसाठीही जावे लागले. ५ एप्रिल २०१८ रोजी जोधपूर सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायदंडाधिकारी देवकुमार खत्री यांनी काळ्या हरिण शिकार प्रकरणात सलमानला दोषी ठरवत पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. सलमानला १० हजार रुपये दंडही ठोठावण्यात आला होता.

सलमान व्यतिरिक्त इतर आरोपींना सोडण्यात आले होते
त्याच वेळी उर्वरित आरोपी सैफ अली खान, नीलम, सोनाली, तब्बू आणि दुष्यंत सिंग यांना निर्दोष सोडण्यात आले होते. सलमानने कनिष्ठ कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात जिल्हा व सत्र न्यायालयात अपील केले होते. ७ एप्रिल रोजी जिल्हा आणि सत्र न्यायालयाने सलमानच्या विरूद्ध सुनावल्या गेलेल्या कनिष्ठ न्यायालयाच्या शिक्षेवर बंदी आणत त्याला सशर्त जामीन मंजूर केला होता. यानंतर सलमानच्या वकिलाने त्याच्या जामिनासाठी अर्ज केला होता, त्यावर अद्याप प्रक्रिया सुरू आहे. सलमान सध्या ‘राधेः युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ या चित्रपटाविषयी चर्चेत आहे. प्रभुदेवा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटात सलमानबरोबर दिशा पाटनी आणि रणदीप हुड्डासारखे कलाकारही दिसणार आहेत.