‘दबंग-३ मधून चुलबुल पांडे येणार भेटीला, लवकरच होणार शूटिंगला सुरवात

मुंबई : वृत्तसंस्था – सलमान खानचा ‘दबंग’ आणि ‘दबंग -२’हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले होते. आता लवकरच या चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘दबंग-३’ या चित्रपटाचे शूटिंग एप्रिल महिन्यात सुरु होणार आहे असा खुलासा अरबाज खानने केला आहे.

एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, ‘दबंग-३’ चे दिग्दर्शन प्रभूदेवा करणार आहे. ‘दबंग’ चित्रपटाला सप्टेंबर २०१८ मध्ये आठ वर्षे पूर्ण झाले. या चित्रपटातून सोनाक्षी सिन्हाने बॉलिवूड डेब्यू केले होते. दबंग-२ मध्येही सोनाक्षीने भूमिका साकारली होती. आता तिसऱ्या भागातही ती झळकणार असल्याचे बोलले जात आहे. सलमान खानने प्रभूदेवासोबत यापूर्वी ‘वान्टेड’ या चित्रपटात काम केले होते. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट हिट झाला होता.

दबंगच्या पहिल्या भागाचे दिग्दर्शन अभिनव कश्यपने केले होते, तर दबंग-२ चे दिग्दर्शन अरबाज खानने केले होते. आता प्रभूदेवाकडे दबंग-३ च्या दिग्दर्शनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र, दबंग-३ ची सुरुवात करण्यापूर्वी सलमान खान ‘भारत’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करणार आहे. ‘दबंग-३’ चित्रपटाच्या कथानकाबाबत अद्याप गुप्तता पाळण्यात आली आहे. जेव्हा याबद्दल सांगण्याची वेळ येईल, तेव्हाच याचा खुलासा करणार असल्याचे अरबाज खानने म्हटले आहे.