सलमानचा जीव अजूनही धोक्यात

मुंबई :पोलीसनामा ऑनलाईन

बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता सलमान खान याच्या जीवाला अजूनही धोका कायम आहे. अशी माहिती सलमानला मारायला आलेल्या शार्पशुटर संपत नेहरा ने सांगितली आहे. संपत ला हरियाणा पोलिसांनी अटक केली आहे. संपत नेहराच्या चौकशी दरम्यान हि माहिती उघडकीस आली आहे. राजू,अक्षय आणि अंकित असे या तीन साथीदारांचे नाव असून , अजूनही मुंबईत ते मोकाट आहेत . त्यामुळे सलमानच्या जीवाला धोका कायम असल्याचे सांगितले जात आहे. या कारणामुळे सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

याबाबत एका इंग्रजी वृत्त पत्राने दिलेल्या वृत्तानुसार , सलमानला मारण्याच्या तयारीत असलेले संपत नेहराचे तीन साथीदार राजू,अक्षय,अंकित हे तिघे मुंबईत मोकाट फिरत आहेत. त्यांचा ठावठिकाणा मिळवण्याचे काम मुंबई पोलीस करीत आहेत. तसेच हे तिघे साथीदार मिळेपर्यंत सलमानच्या जीवाला धोका असल्याचे पोलिस अधिकारयांनी सांगितले.

सलमान खानला काही दिवसांपूर्वी काळवीट शिकार प्रकरणी जोधपूर येथील न्यायालयाकडून शिक्षा सुनावण्यात आली होती. यावेळी लॉरेन्स बिश्नोई या नावाने उघडपणे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती .तेव्हा त्याच्या या धमकीकडे फारसे कुणी लक्ष्य दिले नाही. पण ६ मे रोजी लॉरेन्सचा सहकारी संपत नेहराला हरियाणा पोलिसांनी अटक केली आणि त्याच्याकडून लॉरेन्सचा खुनाचा कट कळला. यामुळेच सलमानच्या सुरक्षेत आता वाढ करण्यात आली आहे.

लॉरेन्सच्या सांगण्यावरूनच अटक केलेला आरोपी संपत मुंबईत आला होता. सलमानच्या घरावर तो लक्ष्य ठेऊन होता. संपतच्या मोबाईल मध्ये सलमानच्या घराचे फोटोही सापडले आहेत. संपत सलमानच्या घराबाहेर रेकी करीत होता. सलमान जेव्हा चाहत्यांना भेटायला गॅलरीत यायचा तेव्हाचे काही फोटो देखील संपत च्या मोबाईल मध्ये सापडले आहे. सलमानची बाल्कनी ते त्याचे अंतर मोजण्यासाठी संपतने फोटो काढले होते. सलमानची हत्या करण्यासाठी संपतला लवकरच हत्यार मिळणार होते. संपत नोकरीच्या शोधात असल्याचे सांगत एका फ्लॅटमध्ये राहत होता. सलमानची हत्या करुन परदेशात जाण्याचा त्याचा कट होता. लॉरेन्स बिश्नोई गँग राजस्थानमध्ये फार सक्रीय गँग आहे. स्वतः लॉरेन्स सध्या तुरुंगात आहे. लॉरेन्सने सलमानला तुरूंगातच जीवे मारण्याची धमकी दिली होती.