नाभिक व्यावसायिकांना व्यवसाय सुरु करायला आठवडाभरात परवानगी द्यावी : माजी आ. मोहन जोशी

पुणे : कोरोना संसर्गजन्य काळातील टाळेबंदी, नव्याने व्यवसाय सुरू करण्यात येणाऱ्या अडचणी पाहाता नाभिक समाजाला आठवडाभरात व्यवसाय सुरु करायला राज्य सरकारने परवानगी द्यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी मुख्य मंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

गेल्या ७० दिवसांहून अधिक काळ लॉकडाऊन असल्यामुळे अन्य व्यावसायिकांप्रमाणे नाभिकांचा व्यवसायही बंद आहे. या व्यवसायातील बहुसंख्य कारागीरांचा चरितार्थ या व्यवसायावरच अवलंबून आहे. लॉकडाऊन च्या काळात व्यवसाय बंद असल्याने त्या संपूर्ण कालावधीत कारागीरांना उत्पन्न मिळालेले नाही. हे व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत. होतकरु तरुणांनी नव्याने व्यवसाय सुरु करण्याचे ठरविल्यास त्यांची आर्थिक ताकद नाही. हे लक्षात घेऊन त्यांना व्यवसाय सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी द्यावी अशी मागणी मोहन जोशी यांनी सरकारकडे केली आहे.