धक्कादायक ! कोरोनाच्या निर्बंधांमुळे दुकान बंद पडल्याने सलून दुकानदाराची आत्महत्या

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. दरम्यान यातूनच एका सलून दुकानदाराने आधीच डोक्यावर कर्जाचं ओझं अन् त्यात आता दुकान बंद केल्याने आलेल्या नैराश्यातून विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान आत्महत्या करण्यापूर्वी त्याने लिहलेली एक चिठ्ठी सापडली असून त्यात सरकारने हातावरचे पोट असणाऱ्या सलून दुकानदारांना करोनाचे नियम अटीशर्थी लावून काम करण्याची परवानगी द्यावी अन्यथा नाभिक बांधवांना अर्थिक मदत करावी, असे म्हटले आहे.

मनोज झेंडे ( रा. सांजा, ता. जि. उस्मानाबाद) असे आत्महत्या केलेल्या सलून दुकानदाराचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सांजा गावात मनोज झेंडे याचे सलूनचे दुकान होते. त्यांची घरची परिस्थिती बेताची असल्याने दैनंदिन सलून व्यवसायावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. मात्र कोरोनामुळे गेल्या दिवसांपासून दुकान बंद झाल्याने आणि गेल्या वर्षीच एका मुलीचे लग्न केल्याने त्यांच्यावर मोठे कर्ज झाले होते. सरकारने सलून दुकाने बंद केल्यामुळे कुटुंबाची उपजिवीका भागत नसल्याने व आर्थिक देणी वाढल्याने आलेल्या नैराश्यातून त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली.

आत्महत्या करण्याअगोदर त्यांनी एक चिठ्ठी लिहून त्यात आपली व्यथा नमूद केल्याचे समोर आले आहे. सुसाइड नोटमध्ये लिहिले आहे की, माझ्या आत्महत्येला कोणालाही दोषी ठरवू नये. मी माझ्या जीवाला कंटाळून आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येमुळे माझ्या घरच्यांना त्रास देऊ नये. तसेच माझ्या घरच्या लोकांवर बायको, भावावर कोणतेही आरोप लावू नये, ही माझी कळकळीची विनंती आहे. मनोज झेंडे यांच्या पश्चात पत्नी दोन मुल, एक मुलगी असा परिवार आहे.