सोलापूर ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केली ‘कोरोना’वर मात

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन –  सोलापूर ग्रामीणच्या कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना लॉकडाऊन, बैठका, बंदोबस्त, पाहणी, निवडणुका आदी कारणांमुळे कोरोनाची लागण झाली. ५ एप्रिल रोजी त्यांचा चाचणी अहवाल सकारात्मक आला. यावरून अधीक्षक सातपुते यांनी आपल्या संपर्कात असणाऱ्या लोकांना काळजी घेण्याचे आवाहन केले. आता त्या बऱ्या झाल्या आहेत. संचारबंदीचे आणि पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक मध्ये सर्वोतोपरी बंदोबस्तावर लक्ष ठेवण्यासाठी अधीक्षक सातपुते ह्या उद्यापासून पुन्हा सेवेत असणार आहेत.

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी कोरोना झाल्यानंतर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेऊन गृह विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला. याबाबतचा संदेश त्यांनी सोशल मीडियावर शेअर करून संपर्कातील लोकांनी काळजी घेण्याचे आवाहन सुद्धा केले होते. त्या काळामध्ये पोलीस अधीक्षक सातपुते यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद साधला, जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना ऑनलाइन मीटिंगद्वारे मार्गदर्शन केले, याव्यतिरिक्त विविध घटनांचा तपास कशा पद्धतीने करावयाचा यासंदर्भातही त्यांनी मार्गदर्शन केल्याचे ग्रामीण पोलिसांनी सांगितले आहे.

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते ह्या कोरोनाकाळात उपचार घेत असताना विलगीकरणातील १० दिवसामध्ये काय केले याबाबत विचारणा केली असता, त्यांनी म्हटले, क्वारंटाइन काळात डॉ. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली वेळेवर औषधोपचार केला. शिवाय वेळ घालविण्यासाठी आवडत्या पुस्तकांचे वाचन करून आवडते चित्रपट बघितल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच, कोरोनाकाळामध्ये पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी वर्क फ्रॉम होमद्वारे सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यासह पोलीस अधीक्षक कार्यालयातील घटना, घडामोडींवर लक्ष ठेवले होते.

अधीक्षक सातपुते ह्या गृह विलगीकरणात असल्याने,अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांना फील्डवर राहावे लागत होते. त्यामुळे महत्त्वाचे निर्णय, महत्त्वांच्या फायलींवर अधीक्षक सातपुते यांनीच सह्या केल्या. यावेळी कोरोनाविषयक सर्व नियमांची काळजी घेतल्याचे ग्रामीण पोलिसांनी सांगितले. या दरम्यान, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते म्हणाल्या की, १५ एप्रिलला माझा १० दिवसांचा कोरोना उपचाराचा कालावधी संपणार आहे. नियमित औषधोपचार, भरपूर आराम केल्याने मी कोरोना आजारातून लवकर बरी झाले. १६ एप्रिलपासून पुन्हा जॉइन होणार असून, शक्य तेवढी काळजी घेऊन पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक बंदोबस्त अन् कडक संचारबंदीमधील बंदोबस्तावर लक्ष असणार आहे.