Pune : कौतुकास्पद ! स्वतःचा जीव धोक्यात टाकून देवदूतांनी केली पुरात अडकलेल्या 2 महिन्यांच्या बाळासह तब्बल 20 जणांची सुटका

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन –  बारामतीमध्ये बुधवारी परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे नद्या, ओढे यांना पुराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान केले तसेच अनेक नागरिकांच्या घरातदेखील पाणी घुसले. पुढचा धोका ओळखून अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. पण बारामती तालुक्यातील सोनगाव येथील सोलनकर वस्तीला चोहोबाजूने कऱ्हा व नीरा नदीच्या महापुराचा वेढा बसला.

बारामती तालुक्यातील मेखळी परिसरात परवा झालेल्या पावसाने संपूर्ण जनजीवन विस्कळीत केले आहे. तसेच कऱ्हा व नीरा नदीला महापूर आला आहे. सोनगाव येथील सोलनकर वस्तीवरील पुराच्या पाण्यात अडकलेल्या शोभा विशाल सोलनकर या आई व त्यांच्या दोन महिन्यांच्या बाळासह २० हून अधिक नागरिकांना रेस्क्यू टीमकडून अथक प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात यश आले आहे.

सोनगाव येथे कऱ्हा आणि नीरा दोन्ही नद्यांचा संगम होत असल्याने ठिकाणी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे. यामुळे त्या गावातील ५० पेक्षा जास्त घरे पाण्याखाली होते. तसेच पावसामुळे सगळ्यांशी संपर्क तुटला होता. कोणाचेच फोन लागत नव्हते. यावेळी माजी सरपंच विकास माने यांनी आमदार रोहित पवार यांना फोन करून या घटनेची माहिती दिली. यावर आमदार रोहित पवार यांनी पटकन निर्णय घेतला. पुढील अर्ध्या तासात पोलिस यंत्रणा त्या ठिकाणी पोहोचली. त्यानंतर रेस्क्यू टीमला बोलावण्यात आले. योग्य वेळी मदत मिळाल्याने पुढील अनर्थ टळला.