Bhandara News : जीगरबाज ! जिवाची बाजी लावून त्यानं 7 बालकांचे वाचवले प्राण

भंडारा : पोलीसनामा ऑनलाइन – येथील शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये लागलेल्या आगीत १० चिमुकल्या बाळांचा मृत्यू झाला. या आगीतून १७ पैकी ७ जणांना वाचवण्यात आले. ज्यावेळी या विभागात धुराचे साम्राज्य पसरल्याचे लक्षात येताच परिचरकांनी या विभागातील बाळांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. यावेळी आपल्या जिवाची बाजी लावून परिचारक अजित कुर्जेकर यांनी ७ बालकांचे जीव वाचवले. सोशल मीडियावर अजित कुर्जेकर यांचा मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात येत आहे.

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील दुर्घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. तसेच देशभरातून या घटनेबाबत शोक व्यक्त करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देतानाच मृत शिशूंच्या पालकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली. राज्यातील सरकारी इस्पितळांचे फायर ऑडिट करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेकांनीया दु:ख व्यक्त केले.

अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये ९ जानेवारीच्या मध्यरात्री लहान बाळांच्या अतिदक्षता विभागात धूर निघत असल्याचं तिथं कामावर असलेल्या नर्सच्या लक्षात आलं. तिनं दार उघडून पाहिलं असता अतिदक्षता विभागात धुराचं साम्राज्य पसरल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर तातडीनं रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांना याची माहिती देण्यात आली. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रयत्नाने अतिदक्षता विभागातील बाळांना बाहेर काढण्यात आलं. या कर्मचाऱ्यांमध्ये परिचारक अजित कुर्जेकर यांचा देखील समावेश होता. आपल्या जिवाची बाजी लावून ७ बालकांचे जीव वाचवणारे अजित कुर्जेकर यांचा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात येत आहे.

दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. तसेच, या आगीच्या घटनेची चौकशी करण्यात येईल आणि मृत बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

आसमंत भेदणारा बाळंतिणींचा हंबरडा
आग लागताच बाहेर थांबलेल्या माता व त्यांच्या कुटुंबीयांनी नवजात कक्षाकडे धाव घेतली. ओल्या बाळंतिणी व त्यांचे नातेवाईक डॉक्टर व नर्सेसमागे धावत होते. प्रशासनाने सगळ्या मातांना पोर्चमध्ये बसवून ठेवले. नेमके कुणाचे बाळ दगावले व कुणाचे वाचले, हे बराच वेळ स्पष्ट होत नव्हते. इनबॉर्न विभागातील मुले वाचल्याचे स्पष्ट झाले व दिलासा मिळाला पण आऊटबॉर्न विभागात आग व धूर अधिक होता. तिथली मुले संकटात असल्याचे समजताच मातांचा आक्रोश सुरू झाला.

भंडाऱ्यातील घटना मन हेलावून टाकणारी – नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरद्वारे शोक व्यक्त केला असून महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात मन हेलावून टाकणारी घटना घडली असून नवजात बाळांनी आपला जीव गमावला आहे. नवजात बाळांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्याबद्दल सहवेदना व्यक्त करतो. तसेच जे बालक जखमी झाले आहेत, ते लवकरात लवकर बरे व्हावेत, असे मोदी म्हणाले.

घटना अत्यंत वेदनादायी राहुल गांधी
या घटनेबाबत राहुल गांधी यांनीही दुःख व्यक्त केले असून भंडाऱ्यातील या घटनेवर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयामधील घटना अत्यंत वेदनादायी आहे. मृत बालकांच्या कुटुंबीयांचं मी सांत्वन करतो. मी महाराष्ट्र सरकारला आवाहन करतो की, या घटनेतील मृत आणि जखमी बालकांच्या कुटुंबीयाना हरतऱ्हेची मदत करावी, असे राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.