CM ठाकरे यांनी मध्यरात्री जखमी जवानांशी साधला संवाद, गडचिरोली पोलिसांचे केले कौतुक !

नागपूर : शौर्याची परंपरा जपणार्‍या महाराष्ट्राला तुमच्या धाडसाचा अभिमान आहे. तुम्ही बजावलेल्या कामगिरीचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून सरकार आणि जनतेच्या वतीने तुमच्या शौर्याला सॅल्यूट करतो, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नक्षलवाद्यांबरोबरच्या चकमकीत जखमी झालेल्या जवानाचे कौतुक केले.

महाराष्ट्र – छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असलेल्या मुरुमभूशी जंगलात गुरुवारी पोलिसांची नक्षलवाद्यांबरोबर चकमक झाली. या ठिकाणी नक्षलवाद्यांची मोठी संख्या असून, त्यांचा शस्त्रास्त्रांचा कारखाना व तेथे शस्त्र साठविण्याचे अड्डे आहेत. तेथे पोलिसांची नक्षलवाद्यांबरोबर सुमारे १६ ते १८ तास चकमक उडाली. पोलिसांनी नक्षलवाद्यांचा शस्त्राचा कारखाना उद्ध्वस्त केला. त्यांना पळून जाण्यास भाग पाडले. या चकमकीदरम्यान पायाला गोळी लागल्याने मोहन उसेंडी हे जखमी झाले. त्यांना शुक्रवारी रात्री नागपुरात आणण्यात आले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील हे रुग्णालयात असतानाच मध्यरात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना फोन केला. पाटील यांच्याकडून जखमी जवानांची माहिती घेतली. त्यानंतर ठाकरे यांनी उसेंडी यांच्याशी संवाद साधला. तुमची कामगिरी अतुलनीय आहे. तुमच्या धाडसाचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून सरकार आणि जनतेच्या वतीने तुमच्या शौर्याला सॅल्यूट करतो, तुम्ही काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा, असे म्हणत ठाकरे यांनी जखमी जवानांचे मनोबल उंचावले. त्यावर उसेंडी यांनी थँक्यू सर, जय हिंद असे म्हणत ठाकरे यांना धन्यवाद दिले.